शहरातील टोल आकारणीच्या विरोधात उद्या सोमवारी निघणाऱ्या मोर्चाची जय्यत तयारी झाली आहे. व्यवहार बंद ठेवून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २ हजारांहून अधिक वाहने व ५ लाख लोकांचा सहभाग असल्याचे टोलविरोधी कृती समितीने स्पष्ट केले असल्याने प्रत्यक्षात मोर्चा कसा निघणार याचे कुतूहल संपूर्ण जिल्ह्य़ामध्ये निर्माण झाले आहे. तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टोल आकारणी होणार, असे विधान चार दिवसांपूर्वी केले होते. पण जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील यांनी या विधानाची सारवासारव करून काँग्रेस पक्षावर होणाऱ्या टीकेपासून बचावात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे उद्याच्या विराट मोर्चा वेळी आंदोलकांकडून नेमके कोणाला लक्ष केले जाणार याची उलटसुलट चर्चाही शहरात सुरू झाली आहे.    
शहरातील अंतर्गत रस्त्यांवर टोल आकारणीविरुद्ध कृती समितीच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले आहे. त्यासाठी उद्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेले आठवडाभर जिल्ह्य़ातील अनेक भागात तसेच गावांमध्ये बैठकांचे सत्र सुरू होते. त्यामध्ये राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संस्था, विविध समाज, व्यापक संघटना यांच्या बैठका होऊन सोमवारच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचा निर्णय झाला आहे. या हालचाली पाहता प्रत्यक्षात मोर्चा कशाप्रकारे निघणार, त्यामध्ये कोणते नेते सहभागी होणार, टोल आंदोलनाला पाठिंबा दिलेले कामगारमंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा सहभाग राहणार का, अशा अनेक मुद्यांमुळे हा मोर्चा लक्षवेधी ठरला आहे.    
दरम्यान पोलिसांनी मोर्चाची तयारी लक्षात घेऊन मोठा बंदोबस्त तैनात करण्याचे ठरविले आहे. त्याचवेळी कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्यास कृती समिती व मोर्चाचे नेते जबाबदार राहतील, असे पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी कृती समितीच्या प्रमुखांना सांगितले आहे. आंदोलकांच्या दाव्यानुसार मोर्चामध्ये २ हजारांहून अधिक वाहने, ५ लाख लोक यांचा सहभाग असणार आहे. खरोखरच असा भरघोस प्रतिसाद मिळाला, तर मोर्चा शांततेत पार पडणार का याचीही कुजबूज सुरू आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टोल आकारणी होणारच, असे विधान कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना चार दिवसांपूर्वी केले होते. त्यावर शहरवासीयांकडून तसेच कृती समितीकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेविषयीचे स्पष्टीकरण केले आहे. यातून मुख्यमंत्री व काँग्रेस पक्षाला टीकेपासून वाचविण्याचा प्रयत्न आहे. या राजकीय घडामोडी आणि पाटील यांचे विधान पाहता मोर्चा वेळी नेते मंडळी कोणावर टिकास्त्र सोडणार याची चर्चा रंगली आहे. शिवाय आषाढ महिन्यातील पावसालाही उद्या सुरुवात होण्याची चिन्हे असल्याने भर पावसात मोर्चा कसा निघणार आणि संयोजक तो कसा हाताळणार या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.