मान्सून सक्रिय झाल्यानंतर वातावरणात सुखद बदल झाल्याचा उपयोग करून, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने निसर्गाचे वरदान लाभलेल्या महाबळेश्वरमधील हेरिटेज रिसॉर्ट पर्यटकांसाठी खुले केले आहे. सव्वाशे वर्षे जुना वारसा आणि त्याला आधुनिक सोयींची जोड या वैशिष्टय़ांमुळे पर्यटक या रिसॉर्टकडे आकर्षित होत आहेत.
महाबळेश्वर ही पूर्वीच्या ‘बॉम्बे प्रेसिडन्सी’ची उन्हाळ्यातील राजधानी होती. या गावात १८८० साली बांधण्यात आलेल्या आणि आता वारसा वास्तू (हेरिटेज स्ट्रक्चर) म्हणून दर्जा लाभलेल्या इमारतीमध्ये काळजीपूर्वक आवश्यक ते बदल करून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) त्याचे रूपांतर ‘हेरिटेज सूट्स’मध्ये केले आहे. ‘सनसेट पॉइंट’जवळ असलेल्या या इमारतीचे मूळ वैभवशाली बाह्य़रूप कायम ठेवतानाच, त्याचे अंतरंग आधुनिक सुखसोयींसह सजवण्यात आले आहे. आलिशान फर्निचर, एलसीडी टीव्ही, सीलिंग फॅन्स, ड्रेसिंग टेबल आणि वेगळ्या प्रकारचे दिवे यामुळे या सूट्सना ‘रॉयल टच’ लाभला आहे. या सर्व खोल्यांच्या भिंतींवर मनोहारी चित्रेही लावण्यात आली आहेत.
हेरिटेज सूट्सच्या सर्व खोल्या वातानुकूलित आहेत. दोन सूट्सचे डिझाइन विशेषकरून अपंगांच्या अडचणी लक्षात घेऊन करण्यात आले आहेत. याशिवाय सर्जनशील मानल्या जाणाऱ्या लेखक आणि कवींसाठी एका सूटमध्ये छोटेखानी ग्रंथालय, स्टडी टेबल आणि आरामखुर्ची अशा सोयी देऊन त्यांनाही रिसॉर्टमध्ये अनुकूल वातावरण तयार करून देण्यात आले आहे.
‘महाबळेश्वर रिसॉर्ट’मध्ये असलेल्या एकूण १२५ खोल्यांपैकी २५ खोल्या ‘हेरिटेज रिसॉर्ट’ असून त्यात एक रायटर्स सूट, दोन प्रकारचे हेरिटेज सूट, याशिवाय प्रत्येकी एक हनिमून सूट, एक्झिक्युटिव्ह सूट आणि प्रीमियम सूट यांचा समावेश आहे. हेरिटेज सूटमध्ये इतर आधुनिक सुखसोयींसह ‘रिलॅक्स’ होण्यासाठी स्पादेखील आहे. अशा रीतीने लेखकांपासून ते ‘हनिमून कपल्स’पर्यंत प्रत्येकाला हवे ते देण्याचा येथे प्रयत्न करण्यात आला आहे.
महाबळेश्वर येथील हेरिटेज हॉटेलमध्ये देश-विदेशातील पर्यटकांना त्यांच्या पसंतीनुसार निवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यभरात अशाच प्रकारे पर्यटकांसाठीच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले. अर्थात, या सूट्सचे वैभव उपभोगण्यासाठी पर्यटकांना दिवसाला ५५०० ते ७ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.