आगामी खरीप हंगामासाठी महाबीजकडून २४ हजार ५८६.३४ क्विंटल बियाणांचा पुरवठा केला जाणार असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी सुबोध मोहरील यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्य़ातील सोयाबीनची उत्पादकता मागील तीन वर्षांपासून कमी होत असून हेक्टरी ४९८ क्विंटलपर्यंत मागच्या (२०१३) खरीप हंगामात घट झाली होती. सोयाबीनचे उत्पादन उत्पादनाचा खर्च लक्षात घेता तोटय़ाचे झाले आहे. म्हणून शेतकऱ्यांनी इतर पर्यायी पिकांचा सोयाबीनऐवजी पेरा करावा, अशी कृषी खात्याची सूचना असून त्यादृष्टीने कृषी खात्याने नियोजन केले आहे. कामठी, मौदा व उमरेड तालुक्यात पेरीव धानाची लागवड केल्यास उत्पादन चांगले मिळू शकते. नरखेड व सावनेर तालुक्यात मका फायदेशीर ठरल्याने मका क्षेत्राचा विस्तार होऊ शकतो. बियाणांची टंचाई आगामी हंगामात जाणवू नये म्हणून कृषी खात्याकडून ५२५ क्विंटल संकरीत ज्वारी साठा मंजूर झाला आहे. २ हजार ४६९.६ क्विंटल बी.टी. कापसाची मागणी नोंदविण्यात आली आहे. १०३४२५ सोयाबीन, मूग १५६, मका ७००, उडीद १६८, एरंडी २८, भुईमूग ७५०, तूर २ हजार ८८० व धान २२ हजार क्विंटल बियाणांची मागणी नोंदविण्यात आली आहे.
बी.टी. कापसाचा यंदा महाबीजकडून ६९३.४० क्विंटल पुरवठा केला जाणार आहे. त्याबरोबरच धान ३ हजार ३६९, उडीद २२.५४, सोयाबीन २० हजार ३५६.२०, तूर १४५.२०, असे एकूण २४ हजार ५८६.३४ क्विंटल बियाणांचा पुरवठा यंदा केला जाणार आहे. त्यामुळे बियाणांचा शेतकऱ्यांनी तुटवडा होणार नाही तसेच बोगस बियाणांवर आळा घालण्यात आला आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांपूर्वी खरीप हंगाम आढावा बैठक झाली. कुठली पिके यंदा शेतकऱ्यांनी घ्यावीत, यावर या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार कृषी खात्याने यंदा नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. अतिरिक्त ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. अर्चना कडू, प्रकल्प संचालिका (आत्मा) डॉ. नलिनी भोयर, कृषी अधिकारी सुबोध मोहरील, ए.बी. उपलेंचवार, डॉ. अतुल नेरकर आदी या बैठकीत सहभागी झाले होते.
नागपूर विभागामध्ये सोयाबीन पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र ६.१३ लाख हेक्टर असून आगामी खरीप हंगामासाठी सार्वजनिक व खासगी क्षेत्रामार्फत सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. शेतक ऱ्यांचा सोयाबीन बियाणे खरेदीवरील खर्च कमी होण्यासाठी घरगुती बियाण्यांचा वापर करण्यास हरकत नसल्याचे कृषी खात्याने स्पष्ट केले आहे.  विभागात सायोबीन बदलाचे प्रमाण ६० टक्के आहे. यामुळे सोयाबीन उत्पादनामध्ये घट येणार नाही. एकदा प्रमाणीत बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे दोन-तीन वर्षांपर्यंत वापरता येते. स्वत:कडील सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरताना शेतकऱ्यांनी अतिरिक्त काळजी घेण्याची गरज आहे.