औरंगाबाद जिल्ह्य़ात येणाऱ्या पर्यटकांना येथील देशातील नृत्य परंपरांची ओळख करून देता यावी, या साठी महागामीच्या वतीने दर शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस संध्याकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत नृत्याविष्काराची मालिका सादर केली जाणार आहे. ‘औरा औरंगाबाद’ या नावाने हा उपक्रम होणार असून कथ्थक, ओडिसी, भरतनाटय़म, कुचिपुडी असे नृत्याविष्कार सादर होणार आहे. महागामीच्या संचालिका पार्वती दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवारी (दि. २९) याचे उद्घाटन होणार असून, पार्वती दत्ता दिग्दर्शित कथक नृत्याविष्कार सादर होणार आहे. २९ नोव्हेंबर ते ५ जानेवारी दरम्यान महागामीतील, तसेच अन्य राज्यांतील कलाकार नृत्याविष्कार सादर करणार आहेत. मुंबईच्या सुजाता नायर यांचे मोहिनीअट्टम, पुणे येथील सुचेता चापेकर, डॉ. संध्या पुरुचा व चेन्नई येथील आनंद सच्चिदानंदन यांचे भरतनाटय़म, दिल्ली येथील अनिता बाबू व सहकाऱ्यांचे ओडिशी नृत्य, झेलम परांजपे व दक्ष मशरूवाला यांचा नृत्याविष्कारही आकर्षण असणार आहे. महात्मा गांधी मिशन संगीत अकादमीच्या वतीने होणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.