चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी भरणाऱ्या करवीरनिवासिनी महालक्ष्मीचा रथोत्सव उद्या शुक्रवारी होत आहे. चांदीच्या रथातून निघणारी मिरवणूक पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होत असते.
कोल्हापुरातील रथोत्सवास जुनी परंपरा आहे. जोतिबाची यात्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रथोत्सव होतो. १९१४ साली रथोत्सव सुरू करण्यात आला. पूर्वी रथोत्सवासाठी लाकडी रथ वापरला जात होता. गेल्या तीन वर्षांपासून लाकडी रथ चांदीने मढविला गेला आहे. त्यासाठी महालक्ष्मीच्या भक्तांनी सढळ हाताने मदत केली होती. महालक्ष्मी मंदिराची उभारणी करताना ज्या घटकांचा अभ्यास केला होता तो रथासाठीही वापरण्यात आला आहे. मिरवणुकीमध्ये हत्ती, घोडे, वाद्ये, छत्रपतींचा लवाजमा, लष्करातील जवान, शासकीय अधिकारी यांचा पूर्वी सहभाग असे. आता भाविकांकडून हा रथ ओढला जातो. रथमार्ग सुशोभित केला जातो. नयनरम्य आतषबाजीही केली जाते.