५०० कलाकारांचा अतिभव्य संच, ७१ फुटी भव्य फिरता रंगमंच, हत्ती, घोडे, उंट यांचा रंगमंचावर प्रत्यक्ष वावर त्याचबरोबर शिवरायांचा निखळ इतिहास, रोमांचकारी प्रसंग, चित्तथरारक लढाया, लोककला आणि लोकनृत्य यांचा सुरेख संगम अशा वैशिष्टय़ांनी युक्त असे ‘शिवगर्जना’ या शिवरायांच्या जीवनावरील महानाटय़ाची निर्मिती करवीरनगरीत झाली आहे. या महानाटय़ाचे आयोजन शाहू यूथ फाऊंडेशनच्या वतीने ७ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत शिवाजी स्टेडियम येथे करण्यात आले आहे.     
‘शिवगर्जना’ या महानाटय़ाचे वैशिष्टय़ म्हणजे ज्या शिवछत्रपतींची एक गादी असलेल्या आणि कलापूर म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरातील स्वप्नील यादव या तरुण दिग्दर्शकाने स्थानिक कलाकारांना घेऊन शिवधनुष्य उचलले आहे. भालजी पेंढारकरांसारख्या सुपुत्राने शिवछत्रपतींचा इतिहास सिनेमा रूपाने पडद्यावर आणला आहे. त्यानंतर येथील नव्या पिढीने पुन्हा एकदा निखळ शिवचरित्र लोकांसमोर पोहोचविण्यासाठी या महानाटय़ाची निर्मिती केली आहे. आर. एल. ज्वेलर्स प्रस्तुत शिवगर्जना या महानाटय़ाचे प्रायोजक सत्यजित ऊर्फ नाना कदम फाऊंडेशन तर सहप्रायोजक प्रतिसाद मिल्क आहेत.    
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी महानाटय़ाचे लेखन केले असून शिवचरित्राचे अस्सल संदर्भग्रंथ आणि शिवरायांची पत्रे यांच्या आधारे शिवरायांचे संवाद लिहिलेले आहेत. या महानाटय़ाच्या निर्मात्या रेणू यादव असून हर्षल सुर्वे शिवरायांच्या भूमिकेत आहेत. या महानाटय़ामध्ये खिलजीच्या आक्रमणापासून, लखोजी राजांची हत्या, शिवजन्म, अफझल खानाचा वध, पन्हाळगडचा वेढा, गटकोटांचे महत्त्व, शेती व्यापारी, सुरतेची लूट, कोकण मोहीम, आग्रा भेट, डोळ्याचे पारणे फेडणारा भव्य राज्याभिषेक सोहळा अनुभवता येईल, अशी माहिती शाहू यूथ फाऊंडेशनचे उपाध्यक्ष नरेश इंगवले यांनी दिली.