नवी मुंबई एमआयडीसी भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वतीने बांधण्यात आलेला महापे-शीळ फाटा उड्डाणपूल मुख्यमंत्र्यांच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे; परंतु मुख्यमंत्र्यांना उद्घाटनासाठी वेळ मिळत नसल्याने तो रखडला आहे.
शीळ फाटा-महापे मार्गावर अलीकडे मोठय़ा प्रमाणात वाहतूक वाढली आहे. जेएनपीटीकडे जाणाऱ्या कंटेनरचा राबता या मार्गावर जास्त असल्याने ठाणे-बेलापूर मार्गही या वाहतुकीमुळे वर्दळीचा झाला आहे. यावर उपाय म्हणून पालिकेने तयार केलेला उड्डाणपूल आराखडा माजी मंत्री गणेश नाईक यांच्या आग्रहास्तव एमएमआरडीएला पूर्ण करावा लागला आहे.
या ठिकाणी ११०० मीटर लांबीचा उड्डाणपूल बांधला गेला आहे. यावर ७१ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून गेली तीन वर्षे सुरू असलेल्या या कामामुळे उद्योजकांच्या वाहनांना द्राविडी प्राणायाम करून कारखाना गाठावा लागत आहे. त्यामुळे हा पूल लवकर सुरू व्हावा यासाठी उद्योजकदेखील मागणी करीत आहेत. काही उच्च दाबाच्या विद्युतवाहिन्यांमुळे या पुलाचे काम अगोदरच रखडले असताना आता गेला महिनाभर हा पूल बांधून तयार असताना केवळ मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने बंद ठेवण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईचा धावता दौरा केला होता. त्यांनी ऐरोली येथील पाणथळ जागांना भेटी दिल्या होत्या. या दिवशी या पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले होते, पण त्या दिवशी उद्घाटन आटपून घेण्यात आले नाही. एमएमआरडीएचे मुख्यमंत्री अध्यक्ष असल्याने त्या प्रशासनाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करून घेण्याचा अट्टहास आहे. त्यामुळे गेला महिनाभर वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे केवळ पालिका निवडणुकीवर डोळा ठेवून समाजकारण करणाऱ्या नवी मुंबईतील एकाही राजकीय पक्षाला हा पूल वाहतुकीसाठी खुला व्हावा, असे वाटत नाही याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.