‘आदर्श’च्या अहवालावरून भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदारांनी विधिमंडळ परिसरात निदर्शने करीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर ताशेरे ओढत निषेध केला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या परस्परांवरील आरोप प्रत्यारोपाने परिसर चांगलाच दणाणला.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ‘आदर्श’ अहवाल पटलावर ठेवून त्यावर चर्चा करण्यात यावी, अशी मागणी करीत शिवसेना, मनसे आणि भाजपचे आमदार सभागृहाच्या बाहेरही आक्रमक झाले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दोषींना पाठीशी घालत असल्याचा आरोप करून त्यांचा निषेध करण्यात आला. आदर्श अहवालात दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळ परिसरात आदर्श इमारतीची प्रतिकात्मक प्रतिमा तयार करून त्यावर ‘हातोडा मार’ आंदोलन केले. मुख्यमंत्री आदर्श प्रकरणाचा अहवालातील दोषांना पाठीशी घालत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी आदर्श इमारतीची प्रतिकात्मक प्रतिमा विधानभवन परिसरात आणून आदर्श अहवाल दडपणाऱ्या सरकारचा निषेध असो, आघाडी सरकार हटाओ, महाराष्ट्र बचाओ अशा घोषणा देत त्यांनी प्रतिकात्मक इमारतीवर हातोडा मारत निषेध केला.
यावेळी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, शिवसेनेचे नेते रामदास कदम, मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर, भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी आदर्शवर चर्चा करण्याची मागणी केली. एकनाथ खडसे म्हणाले, आदर्शमधील दोषींची नावे जाहीर होऊ नये, अहवाल सभागृहात सादर होऊ नये, अशी काँग्रेसची मानसिकता आहे, त्यामुळे मंत्रिमंडळात हा अहवाल फेटाळण्यात आला आहे. कार्यक्रम पत्रिकेवर आदर्शचा विषय नसल्यामुळे खडसे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध केला.
रामदास कदम म्हणाले, सर्व सामान्य लोकांच्या सदनिकांवर कारवाई करून ती बुलडोझरने पाडली जातात. मात्र, वादग्रस्त असलेली आदर्श इमारतीवर कुठलीच कारवाई केली जात नाही, आदर्श प्रकरणात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राज्य सरकार पाठीशी घालत आहे. आदर्शच्या इमारती असलेली जागा संरक्षण विभागाची आहे. जे जवान शहीद झाले त्यांच्या विधवांसाठी सदनिका बांधण्यात आल्या असताना काँग्रेसच्या नेत्यांनी ते हडपले आहेत. आदर्श प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाले असून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सरकारने शेवटच्या क्षणी आदर्शचा अहवाल सभागृहात ठेवल्यामुळे त्यावर कुठलीच चर्चा करण्यात आली नाही. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दोन दिवस वाढवा, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली. स्वच्छ प्रतिमा असलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गुन्हे दाखल झालेल्या मंत्र्यांना पाठीशी घालत आहे. शिवाय आदर्श प्रकरणात अशोक चव्हाण यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला. काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षाचे सर्व आरोप खोडून काढले.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विविध पक्षाच्या नेत्यांनी आदर्श प्रकरणावरून केलेल्या आरोप प्रत्यारोपामुळे विधिमंडळ परिसर दणाणला.