कर्नाटकातील मराठी भाषकांची गळचेपी करण्यासाठी कर्नाटक शासन बेळगावात हिवाळी अधिवेशन घेणार असून त्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने दि. २५ नोव्हेंबर रोजी महाअधिवेशन आयोजित केले असून कर्नाटक शासनाची दडपशाही उधळून लावण्यासाठी महाराष्ट्रातील मराठी बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन आ. संभाजी पाटील यांनी सांगली येथे केले. त्यांनी अधिवेशनासाठी सांगली महापालिकेत येऊन नगरसेवकांना महामेळाव्याचे आमंत्रण दिले.
कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन उधळून लावण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगावात २५ नोव्हेंबर रोजी बेळगावात महामेळावा आयोजित केला असून कर्नाटक सरकारचा हिवाळी अधिवेशनाचा हा प्रयत्न मराठी बांधव कदापि यशस्वी होऊ देणार नाहीत, असा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष आणि दक्षिण बेळगावचे आमदार संभाजी पाटील यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.
या महामेळाव्यासाठी सांगली महापालिकेला निमंत्रण देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आमदार संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली महापालिकेला भेट देऊन महापौर कांचन कांबळे याना निवेदन सादर केले. या वेळी सर्वच नगरसेवकांनी महापौरांना बेळगावात होणाऱ्या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याची विनंती केली. या वेळी महापौर कांचन कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील मजलेकर, सभापती राजेश नाईक यांनी सर्वाचे स्वागत केले.
या वेळी बोलताना आमदार संभाजी पाटील म्हणाले की, गेल्या ५० वर्षांपासून कर्नाटक सरकार सीमावासीयांवर अन्याय करून आता बेळगावात अधिवेशन घेण्याचा कर्नाटक सरकारचा डाव आखला आहे. त्यामुळे सरकारचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. यासाठी महाराष्ट्रातील जनतेने २५ रोजीच्या मेळाव्यात सहभागी व्हावे आणि कर्नाटक सरकारला मराठी अस्मितेची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहनही दक्षिण बेळगावचे आमदार संभाजी पाटील यांनी या वेळी केले.