राज्यावर कर्जाचा डोंगर असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे उधळपट्टी सुरूच ठेवायची असे विरोधाभासी धोरण देवेंद्र फडणवीस सरकार अवलंबित असल्याचे दिसून येते. नागपुरातील विधानभवन, मंत्र्यांचे बंगले आणि इतर इमारतींची डागडुजी आणि रंगरंगोटीवर साडेसात कोटींहून अधिक रक्कम खर्च केले जात आहेत.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानीत घेतले जाते. यासाठी दरवर्षी विधानभवन, मंत्र्यांची बंगले आणि इतर शासकीय इमारतींची डागडुजी तसेच रंगरंगोटीचे कामे मोठय़ा प्रमाणात हाती घेतले जातात. अधिवेशन दोन-चार आठवडे चालविला जातो. परंतु अधिवेशनाच्या तयारीचा भाग म्हणून विविध इमारतींची सजावट आणि इतर बाबींसाठी होणारा खर्च नेहमीच टीकेचा विषय ठरला आहे. आता सत्तेत असलेले आणि आधीचे विरोधक या मुद्दय़ांवरून सरकारवर कोरडे ओढत असत. परंतु सरकारने तेव्हाही या गोष्टींवरील खर्च कमी नव्हता आणि आता नवीन सरकारने देखील खर्चात कुठलीही काटकसर केल्याचे दिसून येते नाही.
सत्तेवर येताच राज्यावर ३ लाख ४४० कोटींचे कर्ज आहे. आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी कठोर पावले उचलणार असल्याचे भाजप सरकारने सांगायला सुरुवात केली. पण प्रत्यक्षात गेल्यावर्षीप्रमाणेच हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी  इमारतींची रंगरंगोटीचे कामे मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. विधानभवन, रविभवन आणि सुयोग भवन या इमारतींच्या डागडुजी आणि रंगरंगोटीसाठी ४ कोटी ८५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. आमदार निवास आणि इतर व्यवस्थेवर सुमारे अडीच कोटी रुपयांचे खर्च केला जाणार आहे.
रविभवन परिसरात गेस्ट हाऊस आणि मंत्र्यांची बंगले आहेत. सुयोग भवनात मुंबई आणि पुण्याकडील पत्रकारांची व्यवस्था केली जाते. आमदार निवासात काही निवडक आमदार वगळता आमदार आणि मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांचे बस्तान असते.
हैदराबाद हाऊसमध्येदेखील कामे सुरू आहेत. पोर्चच्या छताचे काम करण्यात आले आहे. येथे एक ६० लिटर पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. हैदराबाद हाऊसमध्ये शासकीय कार्यालय असल्याने येथे आगंतुकाची वर्दळ असते. त्यांच्या पिण्याची पाण्याची कायमस्वरूपी सोय करण्यात आल्याचे खंड अभियंता संजय पाध्ये म्हणाले. याआधी येथे टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करावा लागत होता. नागभवन देखील तयार ठेवण्यात आला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास काही मंत्र्यांना येथे बंगले दिले जातील. याशिवाय मुख्यमंत्र्यांचा बंगला रामगिरी आणि मंत्रिमंडळातील दोन क्रमांकाच्या मंत्र्याला दिला जाणारा देवगिरी या बंगल्याची डागडुजी तसेच रंगरंगोटीचे कामे पूर्ण झाले आहेत.
रामगिरीची रंगरंगोटीला साडेतीन लाख
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान रामगिरी या बंगल्याच्या डागडुजी आणि रंगरंगोटीवर साडेतीन लाख रुपये खर्च केले जात आहेत. मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक यांच्यासाठी या बंगल्याच्या परिसरात सहा इमारती आहेत.