मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबईतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गुणिजन महासंमेलनात विदर्भातील अक्षर प्रचारक अजय मधुकर भाकरे यांना ‘महाराष्ट्र गुणिजन’ पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. शाल श्रीफळ, सन्मानपत्र, गौरवपदक असे पुरस्कार स्वरुप आहे.
आजच्या संगणकाच्या युगात मुलांच्या हातामध्ये लॅपटॉप आले असून त्यात हस्ताक्षराचे महत्त्व कमी झाले आहे. गेली अनेक वष अक्षरभूषण मधुकर भाकरे यांनी महाराष्ट्रातील विविध भागात हस्ताक्षर सुधारचे व्रत हाती घेतले असताना त्याचा वारसा अजय आणि अभय भाकरे चालवित आहेत. मधुकर भाकरे प्रतिष्ठानतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धा गेल्या दहा वर्षांपासून आयोजित केली जात असून त्यात लाखो विद्यार्थी सहभागी होत असतात.
मुंबईमध्ये झालेल्या पुरस्कार कार्यक्रमाला राष्ट्रीय कीर्तनकार श्यामसुंदर सोन्नर महाराज कवी रमेश अव्हाड, संस्थापक अध्यक्ष कृष्णा जगदाळे उपस्थित होते. उपस्थित वक्त्यांनी अक्षर सुधार प्रकल्पाचे कौतुक करून राज्यात हा उपक्रम राबविण्यात यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या सन्मानाबद्दल अजय भाकरे यांचे रायसोनी ग्रुपचे सुनील रायसोनी, हेमंत सोनारे, सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांनी कौतुक केले आहे.