महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यावर्षी नागपूर विभागीय मंडळात दहावीमध्ये २८ हजार ३१६ पैकी ५ हजार ४११ तर बारावीच्या परीक्षेत २१ हजार ६६९ पैकी ५ हजार ५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. दहावीचा १९.११ तर बारावीचा २३.३४ टक्के निकाल लागला आहे. पुरवणी परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी जास्त आहे.
पुरवणी परीक्षा ८२ केंद्रावर घेण्यात आली होती. मार्चच्या परीक्षेत मोठय़ा प्रमाणात कॉपीचे प्रकार आढळल्यामुळे पुरवणी परीक्षेत कॉपीला आळा बसवण्यासाठी भरारी पथकाची संख्या वाढविली होती तरीही कॉपीचे प्रकार उघडकीस आले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी दहावी आणि बारावीचा निकाल ५ टक्क्यांनी वाढला आहे. दहावीच्या परीक्षेत २८ हजार ५२० विद्यार्थ्यांंची नोंद करण्यात आली असून त्यापैकी २८,३१६ विद्यार्थ्यांंनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ५ हजार ४११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावीच्या परीक्षेत २२ हजार ८७३ विद्यार्थ्यांंची नोंद करण्यात आली. त्यापैकी केवळ ५ हजार ५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
दहावीमध्ये भंडारा विभागातून ६ हजार ७३५ विद्यार्थ्यांंनी परीक्षा दिली असून त्यात १ हजार ३९० विद्यार्थी (१५.५३ टक्के), चंद्रपूर विभागात ५ हजार ६०७ विद्याथ्यार्ंनी परीक्षा दिली असून त्यात १ हजार १२३ (२०.३ टक्के), नागपूर विभागात ९ हजार ८५९ विद्यार्थ्यांंनी परीक्षा दिली असून त्यात १ हजार ५३१ (१५.५३ टक्के), वर्धा जिल्ह्य़ात ३ हजार १९२ विद्याथ्यार्ंनी परीक्षा दिली असून ५१६ (१६.३० टक्के) विद्यार्थी, गडचिरोली जिल्ह्य़ातून १ हजार २४७ विद्यार्थ्यांपैकी ३५९ (२८.७९ टक्के) विद्यार्थी तर गोंदिया जिल्ह्य़ातून १ हजार ७२१ विद्याथ्यार्ंनी परीक्षा दिली असून त्यातून ४९२ (२३.८७ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. नागपूर विभागीय मंडळात सर्वात कमी निकाल नागपूर जिल्ह्य़ाचा लागला असून तर सर्वात जास्त निकाल गोंदिया जिल्ह्य़ाचा लागला आहे.
बारावीच्या परीक्षेत नागपूर जिल्ह्य़ातून १० हजार ४६ विद्यार्थ्यांंनी परीक्षा दिली त्यात २ हजार ५०० उत्तीर्ण झाले. (२४.८९ टक्के), भंडारा जिल्ह्य़ातून २ हजार ६८५ पैकी ६४५ (२४.०२ टक्के), चंद्रपूर जिल्ह्य़ातून ३ हजार ८०३ पैकी ७३५ (१९.३३ टक्के), वर्धा जिल्ह्य़ातून ३ हजार २२३ पैकी ६४५ (२०.०१ टक्के), गडचिरोली जिल्ह्य़ातून १ हजार १५१ पैकी ३५५ (३०.८४ टक्के) तर गोंदिया जिल्ह्य़ातून ७६१ विद्यार्थ्यांंनी परीक्षा दिली असून त्यात १७८ (२३.३९ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. गेल्यावर्षी दहावीचा निकाल १४. २९ टक्के तर यावर्षी १९.११ टक्के तर बारावीचा गेल्यावर्षी १८.८३ टक्के तर यावर्षी २३.२३ टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेत नागपूर विभागात ४३ विद्यार्थी तर बारावीच्या परीक्षेत २६ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले होते. दहावी आणि बारावीची गुणपत्रिकेचे वाटप संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात व शाळांमध्ये २९ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजतानंतर करण्यात येईल. २९ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या दरम्यान विद्यार्थ्यांंना गुणपडताळणीसाठी अर्ज करता येईल. अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंना मार्च २१०४च्या परीक्षेसाठी आवेदन पत्र नियमित शुल्कासह २९ नोव्हेंबर ते ९ डिसेंबपर्यंत सादर करावे.  
निकालाबाबत बोलताना मंडळाचे सचिव अनिल पारधी म्हणाले, गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी पुरवणी परीक्षेत कॉपीचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी झाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांंची संख्या कमी झाली आहे. जे विद्यार्थी कॉपी प्रकरणात सापडले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांना नियमानुसार जी शिक्षा आहे ती देण्यात आली आहे. विद्याथ्यार्ंच्या उत्तरपत्रिकेची गोपनियता राखली जावी व मूल्यमापन वस्तुनिष्ठ पद्धतीने होण्यासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत बारकोड पद्धत अवलंबिण्यात आली होती.