महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि अन्य विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या काही महिलांचे कार्यकर्तृत्व एका ध्वनिफितीमधून उलगडले आहे. महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या ‘महाराष्ट्र कन्या’ या तीन ध्वनिफितींच्या या संचात २७५ कर्तृत्ववान मराठी महिलांचा परिचय करून देण्यात आला असून अनेक मान्यवरांच्या आवाजात हे चरित्र ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे.
या ध्वनिफितीची संकल्पना महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड यांची असून माधवी कुंटे या त्याच्या समन्वयक आहेत. डॉ. चारु शीला ओक यांचे बहुमोल सहकार्य या उपक्रमासाठी लाभले आहे. या ध्वनिफितीचे शीर्षकगीत गौरी कुलकर्णी यांचे असून संगीत नीलेश मोहरीर यांचे आहे. देवकी पंडित यांनी हे शीर्षकगीत गायले आहे. या ध्वनिफितीमध्ये डॉ. विजया वाड लिखित, अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेले आणि शंकर महादेवन यांनी गायलेले ‘विश्वकोश’ अभिमान गीत आहे.  जिजामाता, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, विजया राजाध्यक्ष, प्रतिभाताई पाटील, रुपाली रेपाळे, कमलाबाई होस्पेट, प्रा. डॉ. विजया राजाध्यक्ष, सुलोचना, डॉ. स्नेहलता देशमुख, सोनाली कुलकर्णी, नीला सत्यनारायण, रजनी पंडित, निलिमा मिश्रा, रजनी लिमये, पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील महिलांचा परिचय यात करून देण्यात आला आहे. प्रदीप भिडे, नितीश भारद्वाज, शिबानी जोशी, गौरी देशमुख, श्वेता पंडय़ा, गौरी आंबेकर आदी निवेदकांनी या महिलांच्या चरित्राचे वाचन केले आहे.
ही ध्वनिफित राज्य शासनाच्या चर्नी रोड येथील शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार येथे मिळू शकते.
दरम्यान ‘महाराष्ट्र कन्या’ही ध्वनिफित राज्यातील जास्तीज जास्त महिला आणि शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थींनीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विश्वकोश मंडळातर्फे खास प्रयत्न करण्यात येत आहेत. विशेषत: राज्याच्या अतिदुर्गम, आदिवासी भागात विश्वकोश मंडळाकडून ही ध्वनिफित ऐकविण्याचा आणि त्यावर उपस्थित महिला, मुली आणि तरुणींना आपले विचार व्यक्त करण्याचा उपक्रम गेल्या काही महिन्यांपासून राबविण्यात येत असल्याची माहिती विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.