लोकसभा निवडणुकीचे धक्कादायक निकाल हाती येण्यापूर्वीच स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेत बदल करणाऱ्या मनसेत बदलाची ही प्रक्रिया निकालानंतरही सुरू असल्याचे अधोरेखित झाले आहे. महापालिकेतील मनसेचे गटनेते अशोक सातभाई यांनी या पदाचा राजीनामा दिला. आधी ठरलेल्या सूत्रानंतर वर्षभरासाठी हे पद देण्याचे निश्चित झाले होते. हा कालावधी पूर्ण झाल्यामुळे आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे सातभाई यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसे थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. गतवेळी तगडी लढत देणाऱ्या या पक्षाची घसरगुंडी झाल्यामुळे पक्षाचे स्थानिक आमदार व खुद्द राज ठाकरे हे देखील अवाक्  झाले आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नगरसेवकांनी मनापासून प्रचार करावा यासाठी राज यांनी बरेच प्रयत्न केले होते. काही नगरसेवक प्रचार करत नसल्याच्या तक्रारी झाल्यावर सर्वाना मुंबईलाही पाचारण करण्यात आले. परंतु, या सर्व घडामोडींचा कोणताही सकारात्मक परिणाम झाला नाही. मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांची अनामत रक्कम जप्त झाली. या घडामोडींचा आधीच अंदाज आल्याने शहराध्यक्ष, प्रवक्ता व संपर्क प्रमुखपदी नव्या नावांची घोषणा करण्यात आली. स्थानिक पातळीवर वसंत गीते गटाचे असणारे प्रभुत्व कमी करण्याच्या अनुषंगाने हे बदल केले गेल्याची पक्षात चर्चा सुरू आहे. या घडामोडी सुरू असताना मंगळवारी महापालिकेतील पक्षाचे गटनेते सातभाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. गटनेतेपद वर्षभरासाठी देण्याचे सूत्र निश्चित झाले आहे. या पदावर एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे सातभाई यांनी म्हटले आहे. हा राजीनामा पक्षाने अद्याप स्वीकारलेला नाही. स्थानिक आमदार व प्रमुख पदाधिकारी मुंबईला चिंतन बैठकीसाठी गेल्याचे सांगितले जाते. पुढील १५ दिवसांत राज हे नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी नवीन गटनेतेपदासाठी नावाची निवड केली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.