बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राबाहेर एक गूढ व्यक्तिमत्त्व असून, महाराष्ट्रातल्या जनतेला आजही बाळासाहेब ठाकरे १०० टक्के कळालेले नाही, असे मत ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राला राष्ट्रीय राजकारणात काडीमात्र स्थान नसून महाराष्ट्राची ‘न घर का न घाट का’ अशी अवस्था झाली आहे. आजपर्यंत महाराष्ट्रातला एकही नेता भारताचा पंतप्रधान होऊ शकला नाही. मात्र, बाळासाहेबांनी महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला ताकद दिली व त्याला स्वत:च्या पायावर उभे राहायला शिकवले. त्यामुळे महाराष्ट्राची खरी ओळख बाळासाहेबांमुळे निर्माण झाल्याचे मत लोकसत्ताचे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांनी व्यक्त केले.
वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेच्या वतीने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदरांजलीपर ‘हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे’ या पुस्तकाचे मुकुंद संगोराम यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या वेळी वैद्य दादा खडीवाले, ज्येष्ठ पत्रकार विद्याधर ताठे, मोरेश्वर जोशी, उत्कर्ष प्रकाशनचे सुधाकर जोशी उपस्थित होते. संगोराम म्हणाले, की बाळासाहेबांची शरीरयष्टी हाडकुळी असली, तरी त्यांच्या वाणीत ताकद प्रचंड होती. त्यांच्या भाषणाची बातमी करताना पंचाईत व्हायची. पत्रकारिता करताना एखादा राजकीय पक्ष स्थापन करणे ही एक अशक्य गोष्ट आहे. एका मासिकाच्या जोरावर शिवसेना नावाची चळवळ उभी करणे हे फक्त बाळासाहेब करू शकतात.
विद्याधर ताठे व मोरेश्वर जोशी यांनी, पत्रकारिता करताना बाळासाहेबांशी आलेला संबंध व त्याचे गमतीशीर अनुभव सांगितले. सूत्रसंचालन संगीता वैद्य खडीवाले यांनी, तर प्रास्ताविक सुहास जोशी यांनी केले.