शिक्षण क्षेत्राशी संबंधित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे येत्या १६ डिसेंबरला पटवर्धन मैदानात धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषदेतील सदस्य भगवान साळुंखे, रामनाथ मोते व नागो गाणार यांनी संयुक्तपणे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
२० नोव्हेंबर २०१३ च्या शासन निर्णयाने शिक्षक कपातीच्या दृष्टीने लागू केलेल्या वर्गातील वाढीव संख्या विषयक शासन निर्णय रद्द करावा, शिक्षकेतराच्या भरतीवरील बंदी उठवण्याच्या निर्णयाचा शासनाने फेरविचार करावा, प्रत्येक शाळेत एक ग्रंथपाल व एक प्रयोगशाळा सहायक ही दोन पदे वाढवावीत, २००३ पासून थकित असलेले वेतनेतर अनुदान शाळांच्या विकास निधीत जमा करावे व चालू वर्षी अनुज्ञेय असलेले ५ टक्के प्रमाणे वेतनेतर अनुदान त्वरित द्यावे, मुख्याध्यापक व शिक्षकांवर लादलेली शालेय पोषण आहारासह सर्व अशैक्षणिक कामे काढून घ्यावीत, १ नोव्हेंबर २००५ पासून शिक्षक व शिक्षकेतरांना लागू केलेली अंशदान सेवानिवृत्ती योजना रद्द करून त्याऐवजी जुनी सेवानिवृत्ती योजनाच सुरू ठेवावी, कायम शब्द काढलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये सेवारत असलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण द्यावे, ३ ते ५ ऑक्टोबर २०११ च्या दरम्यान झालेल्या पटपडताळणीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १ हजार १०० शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आढळून आल्यामुळे सुरू असलेली शाळा बंद करण्याची प्रक्रिया थांबवावी तसेच पटपडताळणीमध्ये ५० टक्के पेक्षा जास्त गैरहजेरी आढळून आलेल्या खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांना बचावाची संधी द्यावी, आदी मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात येत असल्याचे आमदारांनी सांगितले.
या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक पाऊल उचलले नाही तर १२ फेब्रुवारी २०१४ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. यावेळी परिषदेचे कोषाध्यक्ष शंकर राघवन, सरकार्यवाह नरेंद्र वातकर, महिला आघाडी प्रमुख पुजा चौधरी, योगेश बन उपस्थित होते.