विचारांच्या आदानप्रदानातून प्रश्नांचे विवेचन झाले, तरच नवीन आव्हान स्वीकारता येऊ शकते. नावीन्याचा ध्यास घेतल्यासच उपेक्षित समाजाची प्रगती शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
सामाजिक न्याय आंदोलनातर्फे तुळजापूर येथील तुळजाभवानी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सत्यशोधक अण्णा भाऊ साठे ‘उपेक्षितांचे विचार’ महासंमेलनाचे उद्घाटन िशदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री मधुकर चव्हाण अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार सि. ना. आलुरे गुरुजी, नरेंद्र बोरगावकर, अप्पासाहेब पाटील, कुलस्वामिनी सूतगिरणीचे अध्यक्ष अशोक मगर, संमेलनाध्यक्ष डॉ. बजरंग कोरडे, जि. प.चे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, नगराध्यक्ष विद्या गंगणे, कामगार नेते गणपत भिसे आदींची उपस्थिती होती. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जीवन खऱ्या अर्थाने उपेक्षितांना प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या विचारांना कृतीची जोड होती. या उपेक्षित समाजातून साहित्याचा हुंकार बाहेर येतोय, ही अण्णा भाऊंच्या विचारांची प्रेरणा आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
डॉ. कोरडे यांनी उपेक्षितांचा व वंचितांचा कैवार घेणाऱ्या अण्णा भाऊंची वैचारिक बठक पक्की होती, असे सांगितले. स्वागताध्यक्ष विजय क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित संदर्भग्रंथाचे प्रकाशन या वेळी झाले. भरवनाथ कानडे यांनी सूत्रसंचालन केले. केशव सरवदे यांनी आभार मानले.