महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत तंटा मिटविणे आणि गावात नव्याने तंटे निर्माण होऊ नये, याकरिता प्रयत्न करण्याइतकेच महत्त्व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास देण्यात आले आहे. वास्तविक, प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा मुख्य उद्देशच गावात वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन ग्रामस्थांमध्ये सुरक्षित आणि सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करणे हा आहे. त्याकरिता विविध विषयांवर लोकसहभागातून प्रभावीपणे उपक्रम राबविणे महत्त्वाचे ठरते. त्याचे मूल्यमापन जिल्हा मूल्यमापन समितीकडून केले जाते.
तंटामुक्त गाव निश्चित करताना मूल्यमापन समिती प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा साकल्याने विचार करते.
तंटामुक्त गाव समितीने तंटे आणि तणाव निर्माण होण्याची प्रमुख कारणे शोधून त्यांचे निर्मूलन होईल यासाठी कार्यवाही करणे,
सामाजिक शांती प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे, त्यांचे प्रबोधन करणे तसेच ग्रामसंरक्षण, मालमत्तांचे संरक्षण, सामाजिक सुरक्षितता आदींबाबत विविध उपक्रम हाती घेऊन गावात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करणे अभिप्रेत आहे.
या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंबंधी गुणदान करताना मूल्यमापन समितीचा प्रत्येक सदस्य प्रत्येक मुद्दय़ावर स्वतंत्रपणे गुणदान करतो. मूल्यमापनासाठी समितीतील उपस्थित सदस्यांच्या गुणांचे एकत्रीकरण करून उपस्थित सदस्यांच्या संख्येने भागून त्यांची सरासरी काढली जाते आणि त्याआधारे प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे गुण निश्चित केले जातात. त्याबाबतच्या अहवालावर मूल्यमापन समितीतील सर्व उपस्थित सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. प्रतिबंधात्मक उपाययोजना सर्व शीर्षांखालील प्रत्येक उपउपाययोजना केल्याची खात्री पटल्यास समिती त्यासंबंधी गुण देते.
गावाने केलेल्या उपउपाययोजनांची व्याप्ती, लोकसहभाग, परिणामकारता यांचा विचार करून त्या उपउपाययोजनेला विहित केलेले पूर्ण अथवा त्यापेक्षा कमी गुण देण्यात येतात. उपउपाययोजनांना मिळालेले गुण एकत्र करून प्रत्येक शीर्षांखालील प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी एकूण गुण दिले जातात.

गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा -बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. मालेतील एक्केचाळीसावा लेख.