‘महात्मा फुले यांची कर्मभूमी असलेल्या पुणे विद्यापीठामध्ये महात्मा फुले यांचा पुतळा उभारणे, ही त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे. महात्मा फुले यांच्या विचारांचा आजही अवलंब होणे आवश्यक आहे,’ असे मत राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी बुधवारी व्यक्त केले.
महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून पुणे विद्यापीठामध्ये उभारण्यात आलेल्या महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री छगन भुजबळ, पुणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री सचिन अहिर, खासदार भालचंद्र मुणगेकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, कुलसचिव डॉ. चंद्रशेखर चितळे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे, विद्यासभेचे, अधिसभेचे सदस्य, शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी के. शंकरनारायणन म्हणाले, ‘‘महात्मा फुल्यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी, महिलांच्या शिक्षणासाठी, कष्टकरी वर्गाच्या आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कार्य केले. आजही त्यांच्या विचारांचा अवलंब करण्याची गरज आहे. सध्या वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी शेतकऱ्याला आज संघर्ष करावा लागत आहे. कमी क्षेत्रफळामध्ये जास्त उत्पादन करणे हे येत्या काळात शेतकऱ्यांपुढील आव्हान आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कृषी विद्यापीठे, शेतकरी यांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कृषी विद्यापीठांना सूचना देण्यात आली आहे.’’
यावेळी चव्हाण म्हणाले, ‘‘बालकांसाठी शिक्षण हे मोफत आणि सक्तीचे करावे हा विचार महात्मा फुले यांनी दिडशे वर्षांपूर्वी मांडला होता, त्यावर आपण आता कायदा केला आहे. महात्मा फुले हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील परिवर्तनाच्या चळवळीचे जनक आहेत. आंबेडकर, शाहूमहाराज यांनी महात्मा फुले यांच्याकडून प्रेरणा घेतली. शिक्षण आणि समता ही दोन तत्त्वे या प्रेरणेच्या मूलस्थानी होती. महात्मा फुले यांचा पुतळा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत राहील.’’
भुजबळ म्हणाले, ‘‘विद्यापीठाच्या आवारात महात्मा फुले यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय झाल्यानंतर पुतळा उभा राहण्यासाठी पाच वर्षे लागली. पुण्यात महात्मा फुले यांचा पुतळा उभा करण्यासाठी नेहमीच अडचण येते. विद्यापीठामध्ये आंबेडकरांचा पुतळा उभारण्याचा निर्णयही अधिसभेमध्ये झाला आहे. तोही लवकरात लवकर उभारण्यात यावा. सध्या रमाबाई रानडे यांच्या जीवनावरील उंच माझा झोका ही मालिका सुरू आहे. त्यामध्ये रमाबाई रानडे यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला असे म्हणण्यात आले आहे. मात्र, सावित्रीबाई फुले यांनीच स्त्री शिक्षणाचा पाया घातला आहे. कुणी इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेतले जाणार नाही.’’