महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे सध्या उरण तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून तालुक्यातील सडलेले विजेचे खांब, तारा तसेच धोकादायक उघडय़ा ट्रान्सफॉर्मरमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. याचा अनुभव गुरुवारी उरण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या उरण चारफाटा येथे उरण परिसरात वीजपुरवठा करणारा सडलेला विजेचा खांब भर रस्त्यात आडवा झाल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणाला इजा झालेली नसली तरी खांब कोसळल्यानंतर विजेचा प्रवाह सुरूच राहत असल्याने अशा घटना घडणे धोकादायक असल्याने या घटनेनंतर उरणच्या नागरिकांनी महावितरण कंपनीच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे महावितरणच्या गलथानपणामुळे उरणकर यमदूतांच्या छायेत वावरत आहेत.
चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी तत्कालीन एमएसईबीने विजेचा पुरवठा करण्यासाठी राज्यात टाकलेले विजेचे खांब, तारा तसेच ट्रान्सफॉर्मर निकामी झालेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी अपघातही घडल्याने महावितरण कंपनीने कोटय़वधी रुपये खर्च करून निकामी खांब, तारा व ट्रान्सफॉर्मर बदलण्याची मोहीम हाती घेतली आहे. उरण तालुक्यात ही मोहीम मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र आजपर्यंत काम पूर्ण झालेले नाही. याचा परिणाम सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. अनेक ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक भार झाल्याने ट्रान्सफॉर्मर जळाल्यास पंधरा पंधरा दिवस विजेपासून वंचित राहावे लागत आहे. महावितरण कंपनीकडून ग्राहकांची लूट सुरू असताना जीव धोक्यात घालून जगावे लागत आहे. दस्तुरखुद्द महावितरणच्या कार्यालयासमोरील सडलेला विजेचा खांब रस्त्यात आडवा झाल्याची घटना घडली होती. तरीही यात सुधारणा झालेली नाही. अनेक गावांतील ट्रान्सफॉर्मर हे उघडे आहेत, तसेच त्यांच्यावर पावसाळ्यात आलेली झाडे, वेली दिसत आहेत. या संदर्भात नागरिकांनी तक्रार करूनही त्यात सुधारणा झालेली नसल्याचे मत मनसेचे संघटक रुपेश पाटील यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात उरणच्या महावितरण विभागाचे साहाय्यक अभियंता उपेंद्र सिन्हा यांच्याशी संपर्क साधला असता महावितरणचे सडेलेले खांब. तारा तसेच ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम सुरू आहे.मात्र मागणी ७०० खाबांची असताना अवघे ४० खांब आलेले आहेत. त्यामुळे आवश्यक तेथे बसविण्यात येणार आहेत. तसेच काही दिवस रखडलेले काम पुन्हा एकदा सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.