वादळी पावसामुळे विस्कळीत झालेला शहरातील वीज पुरवठा त्वरीत सुरळीत करण्याची मागणी मनसेने महावितरणकडे केली आहे. या विषयावर महापौर व वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यात महापालिका व वीज कंपनीची समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंगळवार व बुधवार या दोन दिवशी नाशिक शहरात झालेल्या वादळी पावसाने शहरातील विद्युत विभागाची यंत्रणा पूर्णपणे कोलमडली. महावितरणने कुठल्याही प्रकारची पूर्वपावसाळी तयारी केल्याचे दिसून आले नसल्याचा आरोप मनसेने केला आहे.
अनेक झाडांच्या फांद्या वीज तारांवर आल्या असताना त्या छाटण्याचे काम महावितरणकडून करण्यात आले नाही. सुमारे २९ ठिकाणचे फिडर नादुरूस्त झाले. शहरातील इंदिरानगर, भाभानगर, उपनगर, टाकळीरोड, काठे गल्ली, गंगापूररोड या परिसरातील विद्युत पुरवठा दीर्घकाळ खंडित झाला होता. तसेच जुन्या नाशिकमध्ये २९ तास तर वडाळा गावमध्ये १२ तास वीज पुरवठा सुरळित होऊ शकला नाही.
यावरून महावितरणकडे कुठलीही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे निदर्शनास आले. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर पावसाळ्यात या परिस्थितीला सामोरे जाण्यात येऊ नये म्हणून महावितरणने फिडर दुरूस्ती, लघु व इतर उच्चदाब वाहिन्या, रोहित्र, इन्सुलेटर यांची दुरूस्ती, ज्या ठिकाणी वीज तारांच्या आजूबाजूला असणाऱ्या झाडांच्या फांद्याची छाटणी करावी, ज्या ठिकाणी सातत्याने वीज खंडित होते त्या भागात दुरूस्तीची कामे तत्काळ करावी, शहरातील वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी मनसेतर्फे करण्यात येत आहे.