News Flash

विजेच्या लपंडावामुळे डोंबिवलीकर हैराण

मागील दोन आठवडय़ांपासून डोंबिवलीत महावितरणचा वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने उन्हाळ्याने हैराण झालेल्या डोंबिवलीकरांची अवस्था केविलवाणी झाली आहे.

| May 24, 2014 12:52 pm

मागील दोन आठवडय़ांपासून डोंबिवलीत महावितरणचा वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने उन्हाळ्याने हैराण झालेल्या डोंबिवलीकरांची अवस्था केविलवाणी झाली आहे. सकाळ, दुपार, सायंकाळ कोणत्या वेळेत वीज खंडित होईल याचा नेम नसल्याचे चित्र सध्या या शहरात निर्माण झाले आहे. दोन तासापासून ते पाच तासांपर्यंत वीजपुरवठा बंद राहत असल्याने उकाडय़ाने त्रस्त झालेल्या नागरिकांचा महावितरणविरोधातील रोष वाढत चालला आहे.
 कोणत्या वेळेत वीजपुरवठा खंडित होईल याविषयीची कोणतीही माहिती महावितरणकडून दिली जात नाही. महावितरणच्या नियंत्रण कक्षातील दूरध्वनी सातत्याने बंद असतो. त्यामुळे वीजपुरवठा कधी सुरळीत होणार यासंबंधी विचारणा करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधणाऱ्या नागरिकांना कोणताही प्रतिसाद मिळत नाही. वीजपुरवठा खंडित होण्याचे कोणतेही कारण नागरिकांना सांगण्यात येत नाही. वैशाख वणव्यात नागरिक होरपळत असताना अलीकडे दररोज कोणत्याही वेळेत वीजपुरवठा खंडित होत आहे. विजेचा लपंडाव वेगवेगळ्या विभागांत सुरू असतो.  
कल्याण-डोंबिवली महापालिकेने सिमेंटच्या रस्त्यासाठी रस्ते खोदून ठेवले आहेत. जेसीबीच्या साहाय्याने ही कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांना धक्का लागला आहे. या तुटलेल्या वीज वाहिन्या शोधून तेथे नवीन वाहिनी टाकणे, अशी कामे महावितरणला करावी लागतात. अन्यथा पावसाळा सुरू होताच वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार नित्याचे बनतील, असे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. महावितरणच्या वीज वाहिन्या जमिनीखालून गेल्या आहेत. त्यामुळे रस्त्याकडेची कामे करताना सावधानतेने करावीत, अशी मागणी करणारी पत्रे महापालिका प्रशासनाला पाठवली आहेत. पण त्याची दखल घेतली जात नाही, असे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 12:52 pm

Web Title: mahavitaran continuous power break irritated peaple living in dombivali
टॅग : Mahavitaran
Next Stories
1 पर्यटन केंद्राच्या जागी दशक्रिया विधीची सोय
2 वाहन कर्जातून महाराष्ट्र बँकेची फसवणूक
3 अनास्थेच्या गाळामुळे कल्याणमधील तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर
Just Now!
X