महावितरणाच्या नव्या मीटरचे उद्या प्रात्यक्षिक
रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटरमुळे ठाणेकरांच्या वीजबिलात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्याच्या तक्रारी वाढू लागल्यामुळे खडबडून जागे झालेल्या महावितरणने हे मीटर योग्य आहेत की नाहीत याचे चाचणी प्रात्यक्षिके ग्राहकांना दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या मीटरच्या वेगाविषयी मोठय़ा प्रमाणावर तक्रारी महावितरणला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या मीटरच्या वेगाविषयीचे थेट प्रात्यक्षिके ग्राहकांना दाखविण्यात येणार असून ग्राहकांच्या तक्रारीही ऐकून घेतल्या जाणार आहेत.
ठाणे शहर, कोपरी, पाचपाखाडी, कळवा परिसरांत जुने इलेक्ट्रानिक मीटर बदलून रेडीओ फ्रिक्वेन्सी मीटर बसविण्याची मोहीम महावितरणने गेल्या काही महिन्यांपासून हाती घेतली आहे. त्यानुसार ठाणे परिसरात सुमारे एक लाख दहा हजार नवे मीटर बसविण्यात आले आहेत. इलेक्ट्रानिक मीटरची संकल्पना मोडीत निघू लागल्यामुळे महावितरणने रेडीओ फ्रिक्वन्सीवर चालणारे मीटर कार्यान्वित केली आहेत. असे असले तरी या मीटरमुळे वीज बिलात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या आहेत. ठाणे शहरातून यासंबंधीच्या तब्बल २४० तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महावितरणने या सगळ्या मीटरची तपासणी मोहीम हाती घेतली होती. त्यामध्ये अवघे दोन मीटर सदोष आढळल्याचा महावितरणचा दावा आहे. असे असले तरी वाढीव वीजबिलांमुळे संतप्त झालेल्या ठाणेकर नागरिकांनी मध्यंतरी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा नेला होता. नवे मीटर बदलण्यात यावेत, अशी नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे नवे मीटर योग्य आहेत किंवा नाहीत याचे प्रत्यक्ष अ‍ॅक्युचेक मशीनद्वारे चाचणी प्रात्यक्षिक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळ विभागाचे जनसंपर्क अधिकारी धनंजय पवार यांनी वृत्तान्तला दिली. मीटर तपासणीचे प्रात्यक्षिक पाहाण्याची संधी येत्या २४ जुलै रोजी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ज्या ग्राहकांना हे प्रात्यक्षिक पाहायचे आहे त्यांनी २५८२९१५४ किंवा २५८२६६६६ या दूरध्वनी क्रमांकावर २४ जुलैच्या आधी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन पवार यांनी केले. जुने इलेक्ट्रानिक मीटर आणि नव्या पद्धतीचे मीटर चालतात कसे, त्याचा वेग कसा आहे याचे र्सवकक्ष प्रात्यक्षिक ग्राहकांना यावेळी देण्यात येणार आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.