धोकादायक वीज रोहित्रामुळे महावितरणच्या दिव्याखाली अंधार असण्याकडे ‘लोकसत्ता नाशिक वृत्तान्त’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर आणि या कारणास्तव एका बालकाला प्राण गमवावे लागल्यानंतर महावितरण कंपनीला त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती दक्षता घेण्याची उपरती झाली आहे. उघडय़ा पडलेल्या रोहित्रांवर दरवाजे बसविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.
पावसाळ्यात विजेचे अपघात टाळण्यासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. सर्वसामान्यांना सतर्कता बाळगण्याचा सल्ला देणारी वीज कंपनी स्वत:च्या यंत्रणेबाबत मात्र तशी दक्षता घेत नसल्याचे उघड झाले. वीज कंपनीच्या वीज वितरण यंत्रणेची अवस्था बिकट आहे. उघडय़ा रोहित्रांमुळे अपघातांना निमंत्रण मिळण्याची शक्यता असते. शाळा व निवासी वसाहतीच्या परिसरातील काही रोहित्रांना दरवाजे नसल्याने आतील तारा दृष्टीपथास पडतात. डोंगरे वसतिगृह मैदानाच्या मागील भागात असणाऱ्या शाळा व महाविद्यालयालगतच्या रोहित्राची ही स्थिती आहे. गंगापूर रस्त्यावरील खासगी रुग्णालयासमोरील रोहित्रही त्याच धाटणीचे आहे. या पदपथावरून शालेय विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. उघडे पडलेले रोहित्र त्यामुळे धोकादायक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. संभाजी चौकातील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहाजवळील रोहित्र तसेच सीबीएसकडून महापालिकेकडे जाणाऱ्या रोहित्रावरील दरवाजे गायब झाले आहेत. या विषयावर प्रकाशझोत टाकल्यानंतर महावितरणला दरवाजांचे महत्त्व लक्षात आले. भद्रकाली परिसरात धोकादायक वीज रोहित्रामुळे एका युवकाला प्राण गमवावे लागले. त्यानंतर महावितरणने आता या स्वरूपाच्या रोहित्रांची छाननी केली. त्या अनुषंगाने शरणपूर रस्त्यावरील रोहित्रासह अन्य ठिकाणी दरवाजे बसविण्यात आले.
रस्त्याच्या कडेला असणारी ही रोहित्रे कमी उंचीवर असल्याने नागरिकांसाठी धोकादायक बाब आहे. शहर व परिसरात वीज अपघातांमुळे यापूर्वी काही जणांना प्राण गमवावे लागले आहेत. हे अपघात टाळण्यासाठी नागरिकांच्या बरोबरीने महावितरणने तितकीच खबरदारी घेणे आवश्यक असल्याची भावना नेहमी व्यक्त होते. पावसाळ्यात विजेचे अपघात टाळण्यासाठी नागरिकांना सतर्क करणाऱ्या वीज वितरणने धोकादायक रोहित्रांच्या विषयात सतर्कता बाळगण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.

दरवाजे चोरीचा महावितरणला ताप
विद्युत रोहित्रांवरील दरवाजे चोरीला जाण्याच्या घटनेमुळे महावितरण अडचणीत आली आहे. सातत्याने दरवाजे बदलूनही ती चोरीला जातात. महावितरणने पाहणी करून पुन्हा एकदा सर्व रोहित्रांवर दरवाजे बसविली असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उघडय़ा रोहित्रांवर दरवाजे बसविणे हे कंपनीच्या नियमित कामांपैकी एक काम आहे. ते सातत्याने केले जाते. मात्र, शहरात रोहित्रांवरील दरवाजे चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरवाजे बसविल्याबरोबर दुसऱ्या वा तिसऱ्या दिवशी ती चोरीला जातात. यामुळे रोहित्र उघडे पडते, असे कंपनीने म्हटले आहे. शहरात कुठेही उघडे रोहित्र दिसल्यास महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.