वीज निर्मिती संच नादुरुस्त झाल्यामुळे अचानक विजेची कमतरता निर्माण झाल्याने राज्यात भारनियमनाची स्थिती उद्भवली असून वीज पुरवठय़ासाठी महावितरण कसोशीने प्रयत्न करीत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यात बंद झालेल्या संचामुळे कमी झालेली विजेची उपलब्धता शिवाय गुजरात व मध्य प्रदेशातही बंद झालेले संच यामुळे वीज यंत्रणेची कंपनता (फ्रिक्वेन्सी) ४९.५ हर्ट दरम्यान राहिली. यामुळे आज राज्यात सुमारे तीन ते सहा तासांचे भारनियमन करावे लागले. राज्यातील विजेची गरज भागविण्याची तरतूद महावितरणने विविध स्रोतांकडून केलेली आहे. परंतु काल अचानकपणे अदानी १ हजार ३२० मेगाव्ॉट, इंडिया बुल्स ५०० मेगाव्ॉट, जेएसडब्ल्यू ६०० मेगाव्ॉट व केंद्रीय प्रकल्पातील ५०० मेगाव्ॉटचे संच बंद पडले. परिणामी
राज्यात ३ हजार मेगाव्ॉट विजेची तूट निर्माण झाली.
हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पाऊस वेळेत न आल्यास कोयना हाताशी असणे आवश्यक आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या आपत्कालिन स्थितीची शक्यता लक्षात घेऊन कोयनेचे पाणी राखून ठेवण्यात आलेले आहे. राज्यातील विजेचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी महावितरणने आज केंद्रीय पॉवर एक्सचेंजमधून सुमारे १ हजार २०० मेगाव्ॉट वीज शिवाय अल्पकालीन वीज खरेदीद्वारे २८५ मेगाव्ॉट वीज घेतली आहे. काल इंडिया बुल्सचा २७० मेगाव्ॉट व परळीचा २१० मेगाव्ॉट संच सुरू झाला आहे. तरीही यंत्रणेत सुमारे २ हजार मेगाव्ॉट तूट असल्याने भारनियमन करावे लागत आहे. उद्या अदानी ६६० मेगाव्ॉटचा संच कार्यान्वित होणे अपेक्षित असून आजच्याप्रमाणे उद्याही एक्सचेंजमधून जास्तीत जास्त वीज घेण्याचा महावितरणचा प्रयत्न असल्याची माहिती उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटणकर यांनी दिली. अचानकपणे सुरू झालेले हे भारनियमन लवकरात लवकर संपवावे यासाठी प्रयत्न सुरू असून ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.