मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते नितीन गडकरी यांच्यातील भेटीगाठीमुळे शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता लोकसभा निवडणुकीत अडचणीची ठरू नये म्हणून गुरूवारी महायुतीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावत मनोमीलन घडविण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी सेना, भाजप व रिपाइं या तिन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या शहर, जिल्हा व विभाग पातळीवर समन्वय समिती स्थापनेचा निर्णय घेत महायुतीने अंतर्गत असमन्वय दूर करण्याचा प्रयत्न केला. मनसे-भाजपमध्ये जवळीक वाढल्यानंतर शिवसैनिकांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण झाला नसल्याचा दावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. प्रचाराचे नियोजन करण्याच्या दृष्टीने यावेळी चर्चा करण्यात आली.
भाजपच्या नेत्यांनी मनसे अध्यक्षांची भेट घेतल्यावर युतीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर चांगलेच मतभेद निर्माण झाले. स्थानिक पातळीवरही त्याचे पडसाद वेगवेगळ्या पध्दतीने उमटू लागले. दिंडोरी मतदारसंघात भाजप उमेदवाराचे काम करणार नसल्याची भूमिका काही शिवसैनिकांनी घेतली. नाशिक महापालिकेत मनसे-भाजप यांची सत्ता असल्याने लोकसभा निवडणुकीत भाजप कोणाला मदत करणार याबद्दल शंका-कुशंका व्यक्त होऊ लागल्या. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, आयोजित बैठकीत मुख्यत्वे असे मतभेद नसल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न झाला. संपर्कमंत्री रवींद्र मिर्लेकर, भाजपचे डॉ. राजेंद्र फडके, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, रिपाइंचे प्रकाश लोंढे यांच्यासह नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत गोडसे व हरिश्चंद्र चव्हाण उपस्थित होते.
सेना-भाजपमध्ये कोणतेही अंतर्गत वाद नाहीत. गेल्या काही दिवसातील घडामोडींमुळे कोणताही संभ्रम निर्माण झाला नव्हता. संभ्रमाचे चित्र प्रसारमाध्यमांकडून निर्माण केले गेल्याची भावना पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. दोन्ही पक्षातील कार्यकर्ते दोन्ही मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी एकदिलाने काम करतील, असा विश्वास मिर्लेकर यांनी व्यक्त केला. महायुतीतील सर्व पक्षांचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी होणार आहेत. प्रचाराचे नियोजन करण्यासाठी शहर, जिल्हा व विभाग पातळीवर समन्वय समिती स्थापन करण्यात येईल. ग्रामीण भागात गावोगावी तर शहरात प्रभागनिहाय कार्यकर्त्यांच्या संयुक्त बैठका, प्रचार फेरी व सभांचे नियोजन करण्याच्या मुद्यांवर चर्चा झाली. प्रचाराचे योग्य पध्दतीने नियोजन होण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत समन्वय समिती स्थापन केली जात असल्याचे सावजी यांनी सांगितले.