केंद्र व राज्य सरकारमधील कोळसा, स्पेक्ट्रम व सिंचन घोटाळा यांसह शेतकरीविरोधी धोरणावर सडकून टीका करतानाच काँग्रेस व राष्ट्रवादीवर महायुतीच्या मेळाव्यात हल्ला चढविण्यात आला. नरेंद्र मोदी हेच एनडीएचे पंतप्रधान असतील, असा विश्वास मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.
परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा महात्मा फुले विद्यालयाच्या मदानावर झाला. परभणी व जालना जिल्ह्यांतील शिवसेना-भाजपसह महायुतीचे नेते उपस्थित होते. गेल्या २४-२५ वर्षांपासून शिवसेना-भाजप युती कायम आहे. रामदास आठवले यांना दोन वर्षांपूर्वी सोबत घेतले. आता स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्ष हेही परिवर्तनाच्या प्रवाहात आले आहेत. त्यामुळे महायुती पहिलवानासारखी भक्कम झाली आहे. कोणीही समोर आला तरी महायुतीचा पहिलवान हरणार नाही, असे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई म्हणाले. महायुती काँग्रेस-राष्ट्रवादीचे जाती-पातीचे राजकारण उखडून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार करताना २८ फेबुवारीला राज्यभर महायुतीतर्फे २२ तोंडी राक्षसरूपी रावणाचे दहन करण्यात येणार आहे, असे त्यांनी जाहीर केले.
भाजपचे शेतकरी नेते माजी आमदार पाशा पटेल यांनी ‘जो किसान हित की बात करेगा, वह देशपर राज करेगा’ असा नारा देत मोदी हे पंतप्रधान झाल्याशिवाय कापूस, सोयाबीन व अन्य पिकांना उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा या सूत्राप्रमाणे शेतीमालास भाव मिळणार नाही, असे सांगितले. शेतीमाल व मजुरीचे दर ठरविण्याची सध्याची पद्धत चुकीची आहे. सुलभ शौचालयाचा वापर करण्यासाठी ५-१० रुपये मोजावे लागतात. ही स्थिती असताना कृ षिमूल्य आयोग एक हेक्टर शेती सिंचनासाठी एक वेळचा खर्च ४ रुपये ७७ पसे गृहीत धरते. त्यामुळे स्वामीनाथन समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी केल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न मिटणार नाही, असेही पटेल म्हणाले.
भाजप प्रदेश सरचिटणीस विजय गव्हाणे यांनी राष्ट्रवादीच्या पवार काका-पुतण्यावर हल्ला चढवून त्यांनी मराठय़ांचे वाटोळे केले, असा आरोप केला. मराठा आरक्षणाचे वाटोळे करण्यात बाबा, दादा, आबा या मराठा नेत्यांचाही पुढाकार आहे, असे सांगितले. गोपीनाथ मुंडे हे राज्यातील महायुतीचे महानायक, तर मोदी एनडीएचे पंतप्रधान आहेत. देशात परिवर्तनाची लाट आली आहे, असे ते म्हणाले. मराठवाडय़ातील जनता सोशिक आहे. निजामाच्या जुलमी राजवटीत मराठवाडय़ाने अन्याय, अत्याचार सहन केले. आता पश्चिम महाराष्ट्राच्या पुढाऱ्यांमुळे अन्याय सहन करावा लागत आहे. ही राजवट उखडून टाकण्यासाठी जाती-पातीच्या िभती झुगारून सर्वजण महायुतीच्या झेंडय़ाखाली एकत्र आले आहेत. सामाजिक अभिसरणाचे काम महायुतीमुळे चालू आहे, असे रिपाइंचे अॅड. गौतम भालेराव यांनी म्हटले.
जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिल्रेकर, आमदार संजय जाधव व मीरा रेंगे, सेनेचे उपनेते लक्ष्मण वडले, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आमदार हरिभाऊ लहाने, डॉ. राहुल पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक कदम, रासपचे बालासाहेब जोरवड यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर कल्याण रेंगे, माजी आमदार शिवाजीराव चौथे, बबन लोणीकर, जिल्हाप्रमुख संदीप भंडारी, डॉ. संजय कच्छवे, आसाराम बोराडे, भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे, रिपाइंचे डॉ. विजय गायकवाड, सखुबाई लटपटे उपस्थित होते.
‘दगाबाजांना माफी नाही’
परभणीचा शिवसेनेचा खासदार गद्दार होतो, हे ऐकून खंत वाटते, वाईट वाटते, चीडही येते. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी विश्वासघात केला, आज ते कोठे आहेत व कोणाच्या घरी पाणी भरीत आहेत, हे सर्वाना माहीत आहे, असे सांगून देसाई यांनी दगाबाजांना माफी नाही, असे ठणकावले. त्यांची डोकी फिरली असली तरी मतदारांचा शिवसेनाप्रमुख व भगव्यावर दृढ विश्वास आहे, असे ते म्हणाले.