राज्य शासनाने महापालिका हद्दीत लागू केलेल्या स्थानिक संस्था कराविरुद्ध (एलबीटी) नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्ससह विविध व्यापारी संघटनांनी एक दिवसीय बेमुदत संपाचा ‘एल्गार’ पुकारला. शहरातील मुख्य बाजारपेठसह इतर भागातील व्यापारी प्रतिष्ठाने काही प्रमाणात बंद असल्याने एलबीटी विरोधी बंदला आज संमिश्र प्रतिसाद मिळाला. आजच्या बंदमुळे जवळपास २०० ते २५० कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज आहे.  
शहरात १ एप्रिलपासून स्थानिक स्वराज्य कर लागू करण्यात आल्यानंतर त्याचा विरोध करण्यासाठी नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने जवळपास २२ दिवस व्यापार बंद ठेवून सरकारचा निषेध केला. व्यापाऱ्यांनी आंदोलन उग्र केल्याने त्यावेळी सरकारने एलबीटीच्या नियमामध्ये शिथिलता आणली आणि व्यापाऱ्यांनी बंद आंदोलन मागे घेतले असले तरी त्यांचे आंदोलन सुरू होते. मधल्या काळात त्यांनी स्वाक्षरी मोहीम राबविली. एलबीटीमुळे महापालिकेने व्यापाऱ्यांवर पुन्हा एकदा कारवाई सुरू केल्याने व्यापारी त्रस्त झाले आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे व्यापाऱ्यांनी पुन्हा एलबीटी रद्द करावा, अशी मागणी करीत शुक्रवारी व्यापार बंद ठेवून चेंबरचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल, एलबीटी संघर्ष समितीचे प्रमुख रमेश मंत्री यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनावर मोर्चा काढाला.
यशवंत स्टेडियममधून मोर्चा काढण्यात आल्यानंतर टेकडी रोडवर अडविण्यात आला. यावेळी राज्य सरकार जोर्पयच एलबीटी रद्द करीत नाही तोपर्यंत व्यापाऱ्यांनी हटायचे नाही असा पवित्रा घेतला. दरम्यान, खासदार विलास मुत्तेमवार, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, आमदार सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, दीनानाथ पडोळे, माजी महापौर विकास ठाकरे यांनी मोर्चाला भेट दिली आणि व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन दिले. विलास मुत्तेमवार यांच्या नेतृत्वाखाली नागविदर्भ चेंबरचे शिष्टमंडळ नागरी विकास मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सामंत मोर्चासमोर आले आणि एलबीटी रद्द करण्यासंदर्भात त्यांनी आश्वासन दिले.
दरम्यान, चेंबरने व्यापार बंदचे आवाहन केल्यामुळे शहरातील विविध भागातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांना त्याचा फटका बसला. इतवारी, सराफा ओळ, धान्य बाजार गांधीबाग, सीताबर्डी, महाल, केळीबाग, नंदनवन, सक्करदरा, ग्रेट नाग रोड या भागातील व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद होती. मात्र सायंकाळी काही भागातील प्रतिष्ठाने उघडण्यात आली. व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या या बंदला विविध व्यापारी संघटनांनी आणि काही सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. गजबजलेल्या इतवारी आणि सराफा बाजारात शांतता होती.
 मोर्चामुळे व्यापारी प्रतिष्ठाने बंद असल्याने दुकानांमध्ये अनेक कामगार मोर्चात सहभागी झाले होते. कधी नव्हे ते मोमीनपुरामधील बाजार काही प्रमाणात बंद होता. नागपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष रविकांत हरडे यांच्यासह किशोर धाराशिवकर, पुरुषोत्तम कावळे, राजेश काटकोरिया, राजेश रोकडे आदी मोर्चात सहभागी झाले होते. जोपर्यंत एलबीटी रद्दची अधिसूचना जाहीर केली जात नाही तोपर्यत बाजारपेठ बंद ठेवण्याचा यावेळी इशारा व्यापारी संघटनांनी दिला आहे. आजच्या बंदला व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिल्यामुळे अंदाजे २०० कोटीचा व्यवसाय ठप्प झाल्याचे एनव्हीव्हीसीचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी सांगितले. राज्य सरकारने आश्वासने दिल्यानंतरही एलबीटी रद्द करण्यासंदर्भात त्याची अंमलबजावणी केली नाही तर येणाऱ्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला.