इंडसइंड बँकेतील चोरीतील मुख्य सूत्रधार अंकुश नामदेव भोरे (२५, गोकुळवाडी, सर्जेपुरा) याच्यासह टोळीतील प्रकाश दशरथ भोरे (शिवाजीनगर, वडारवाडी, पुणे) या दोघांना पोलिसांनी आज पहाटे पुण्यात अटक केली. दोघांकडून लुटीतील १२ लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. अंकुश हा पूर्वी बँकेतच कामाला होता, त्याचवेळी त्याने चोरीचा कट आखला, असे तपासात पुढे आले आहे.
इंडसइंड बँकेच्या चोरीत आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली आहे. काल इरफान शेख जाकीर, सय्यद शेख इक्बाल व चांद सलिम सय्यद या तिघांना अटक करून त्यांच्याकडून ११ लाख ३० हजार रु. जप्त करण्यात आले. या तिघांना न्यायालयाने दि. २९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश आज दिला. त्यापूर्वी बँकेतीलच कर्मचारी आदिनाथ आढाव, योगेश बारगळ व ललित चौधरी या तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांच्या पोलीस कोठडीची मुदत उद्यापर्यंत आहे. या तिघांचा व टोळीचा काही संबंध आहे का, याची खातरजमा पोलीस करत आहेत. लुटीत एकूण २८ लाख १६ हजार रु. पळवले गेले होते. त्यातील एकूण २३ लाख ३० हजार रु. पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
पोलीस निरीक्षक अशोक ढेकणे, हवालदार सुरेश डहाके, राजेंद्र वाघ, कदम, सुरेश माळी, संदिप पवार, दत्ता हिंगडे यांच्या पथकाने अकुंश भोरे व प्रकाश भोरे या दोघांना पुण्यात अटक केली. अंकुश व प्रकाश हे दोघे मावसभाऊ आहेत. अंकुश हा पूर्वी इंडसइंड बँकेत कामाला होता.
दि. २१ डिसेंबरच्या रात्री अंकुश व इरफान असे दोघे पोलीस मुख्यालयातील भिंतीवरुन इमारतीत गेले, प्रकाश व चांद असे दोघे खाली इमारतीच्या दरवाजाजवळ थांबले व आणखी दोघे चौकात थांबले, बनावट किल्लीने अंकुशने रोखपाल आढाव याच्या ड्रॉवरमधील तिजोरीच्या किल्ल्या हस्तगत केल्या व रक्कम पळवली. चोरीनंतर अंकुश व प्रकाश दोघेही जिवाची मुंबई करण्यास गेले, पुण्यात परतल्यावर त्यांना अटक झाली.