आरोग्य, पर्यावरण, शिक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्या मैत्री परिवार या संघटनेने समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मैत्री परिवारातील सर्व सदस्य आपल्या मिळकतीतील काही पैसा सामाजिक कामासाठी खर्च करतात. अत्यंत गरिबाच्या हृदयशस्त्रक्रियेसाठी असो, झोपडपट्टी जळून निर्धन झालेल्या लोकांसाठी असो किंवा गरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक व अन्य मदत करणारी मैत्री संस्था प्रसिद्धीपासून फार दूर आहे. आम्ही चांगल्या गोष्टीची पेरणी करीत आहे. प्रसिद्धीसाठी आम्ही कामच करत नाही, असे प्रांजळ मत मैत्री परिवारातील सदस्य व्यक्त करतात.
मैत्री परिवार या संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, सचिव प्रा. प्रमोद पेंडके, कोषाध्यक्ष अनुप सगदेव आणि व्यवस्थापक संजय नखाते यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’ला सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी मैत्री संस्थेवर लोकांचा कसा विश्वास बसत आहे, यावर प्रकाश टाकला. २००० मध्ये मैत्री परिवाराची स्थापना झाली. सुरुवातीला महाल परिसरातील संघ इमारतीच्या परिसरात सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम होऊ लागले. सुरुवातीला श्रीधर फडके यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी प्रवेश शुल्क ठेवले होते. परंतु आवड असताना एका गृहस्थाने आर्थिक टंचाईमुळे हा कार्यक्रम बघू शकत नसल्याचे सांगितले. यानंतर लगेच एका महिन्याने हाच कार्यक्रम नि:शुल्क ठेवण्यात आला. या कार्यक्रमाला जे काही प्रोत्साहन मिळाले, त्यात अजूनही भरच पडत आहे. यानंतर २००६ पासून ‘मैत्री पुरस्कार’ दिला जाऊ लागला. पहिला पुरस्कार निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांना देण्यात आला. यानंतर देवाजी तोफा, अभय बंग, सचिन बुरघाटे आदींना हा पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे हे पुरस्कार देण्यासाठी अर्ज मागवले जात नाही. अर्ज मागवणे म्हणजे, पुरस्कारासाठी दबाव येणे होय, असे स्पष्ट भूमिका मैत्री परिवाराची आहे.
समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार करून तेथेच थांबत नाही तर आणखी अनेक सामाजिक उपक्रम राबवते. गेल्यावर्षी चिखली- कळमना परिसरातील झोपडपट्टीला आग लागली होती. त्यात शंभराहून अधिक कुटुंबे उघडय़ावर आली होती. त्यामध्ये तीन गर्भवती महिलांचाही समावेश होता. यावेळी सर्वप्रथम पुढाकार घेऊन या कुटुंबाला अन्नधान्याचा पुरवठा केला. तर तीन गर्भवती महिलांची प्रसूतीसाठी येणारा संपूर्ण खर्च मैत्रीने केला. तसेच काटोलजवळील एका गावात नेत्रतपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात २२ जणांवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. यांच्यावर डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली खरी. परंतु हे २२ रुग्ण व त्यांचा प्रत्येकी एक नातेवाईक अशा ४४ जणांना मैत्री परिवारातून जेवणाचे डबे जात होते. गेल्या दोन वर्षांत तीन व्यक्तींवर हृदयशस्त्रक्रिया केल्यात. एका कान नसलेल्या आठ वर्षांच्या मुलीवर डॉ. दंदे यांच्या सहयोगाने यंत्र उपलब्ध करून दिले असून उपचार सुरू आहेत. शहरातील विविध शाळांतील अत्यंत गरीब कुटुंबातील १०० मुले व १०० मुलींना दत्तक घेतले आहे. या सर्व मुलांना प्रवेश शुल्कापासून शैक्षणिक साहित्य, पोषाख व अन्य लागणारा खर्चही दिला जातो. मैत्रीने एका अत्यंत गरीब मुलीला ‘आयएएस’करण्याचे ध्येय ठेवले असून त्यासाठी सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
मैत्रीतील एका सदस्याच्या लग्नाच्या ४०व्या वाढदिवसानिमित्त नुकताच ४४ जोडप्यांचा सामूहिक विवाह आयोजित करण्यात आला होता. प्रत्येक जोडप्याला १० हजाराचे बँकेचे फिक्स डिपॉजिट (मुदत ठेव) काढून दिले. संसाराला लागणारी भांडीही उपलब्ध करून दिली. या विवाह सोहळ्यात दोन लाख वऱ्हाडय़ांनी भोजनाचा आस्वाद घेतला. यावरून किती खर्च केला असेल याची कल्पनाच केलेली बरी. यानंतरही मैत्रीचा कोणताही सदस्य झालेला खर्च सांगण्यास तयार नाहीत. मैत्रीने शववाहिकाही उपलब्ध करून दिली आहे. एवढे मोठे सामाजिक काम करत असतानाही मैत्रीने कधी प्रसिद्धीचा हव्यास धरला नाही. मैत्रीचे हे धोरण क्षुल्लक कामे करून मोठे होण्याचा प्रयत्न करणाऱ्या सामाजिक संस्था व व्यक्तींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. सर्वत्र व्यावसायीकरण होत असताना तुम्ही हे उपक्रम कसे राबवता, या प्रश्नाच्या उत्तरात सदस्य म्हणाले, मैत्री परिवाराचे तीन हजार सदस्य आहेत. हे सर्व सदस्य शंभर रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत स्वेच्छेने आर्थिक मदत करतात. कुणी किती द्यावे, यासाठी दबाव आणला जात नाही. मैत्रीच्या उपक्रमावर विश्वास ठेवणारे दानदाते पुढे येतात आणि मदत करतात.
मैत्री आता आपला विस्तार करीत आहे. पुण्याला नुकतीच एक शाखा उघडली असून तेथे येत्या पावसाळ्यात तेथील दहा कि.मी. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यासाठी हैदराबादेतून खास वृक्ष बोलावण्यात येणार आहे. वृक्ष लागवड करून थांबणार नसून प्रत्येक एक कि.मी. अंतराची जबाबदारी एका सदस्याकडे सोपवली जाणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक आणि अकोला येथे शाखा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुंबईसाठी चर्चा सुरू असल्याची माहितीही सदस्यांनी याप्रसंगी दिली. अनेक उपक्रम राबवत असताना मैत्री परिवारातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होत नाही. नागपूर शहरात पक्षांसाठी घरटे उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचेही सदस्यांनी याप्रसंगी सांगितले.

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
ग्रामविकासाची कहाणी
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
nagpur, couple, Kidnapped, Young Engineer girl, Inspired by Web Series, police arrested, accused, marathi news,
वेबसिरीज बघून आखला अपहरणाचा कट; तरुणीचे अपहरण, प्रेमीयुगुल…