News Flash

हातघाईच्या लढाईसाठी दिग्गज मैदानात

अखेरच्या क्षणी ताटातूट झाल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या चारही पक्षांना जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत उमेदवारांची निवड करताना अक्षरश: हातघाईची लढाई करावी लागत आहे. शुक्रवारी

| September 27, 2014 02:02 am

अखेरच्या क्षणी ताटातूट झाल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या चारही पक्षांना जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत उमेदवारांची निवड करताना अक्षरश: हातघाईची लढाई करावी लागत आहे. शुक्रवारी प्रमुख राजकीय पक्षांच्या दिग्गज उमेदवारांसह अपक्षांनी प्रचार फेरीद्वारे शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी केली. नाशिक शहरातील मध्यवर्ती भागात एकाच दिवशी मिरवणुकीद्वारे शक्तिप्रदर्शन करण्यात येऊ नये या पोलिसांच्या आवाहनाला उमेदवारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे अपवाद वगळता इतरत्र फारशी वाहतूक कोंडी झाली नाही. शनिवार हा अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे.
युती व आघाडीचे मार्ग स्वतंत्र झाल्यानंतर शुक्रवारचा दिवस विलक्षण घडामोडींचा ठरला. प्रत्येक मतदारसंघात सेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी यांना उमेदवार उभे करावयाचे असल्याने प्रबळ उमेदवारांचे नाव निश्चित करताना गोंधळ उडाल्याचे दिसत होते. भाजप उमेदवारांची यादी जाहीर झालेली नसल्याने बहुतेकांनी या दिवशी अर्ज भरणे टाळले. राजकीय पक्षातील बेबनावामुळे अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवसापर्यंत फारसे अर्ज दाखल झाले नव्हते. स्वतंत्र लढतीवर शिक्कामोर्तब झाल्यावर शुक्रवारी प्रत्येक मतदारसंघात अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेने कमालीचा वेग घेतला. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील नाशिक पश्चिम, नाशिक मध्य, नाशिक पूर्व आणि देवळाली मतदारसंघाकरिता अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची एकच गर्दी झाली. काही राजकीय पक्षांनी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर न करता ऐनवेळी अर्ज भरण्याचे निरोप धाडले. यामुळे बहुतेकांनी पक्षाच्या अधिकृत मान्यता कागदपत्राशिवाय अर्ज दाखल केले.
काही उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करून अर्ज दाखल करण्याची तयारी केली होती. एकाच वेळी अनेक मिरवणुका निघाल्यास वाहतूक व्यवस्था ठप्प होऊन कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पाश्र्वभूमीवर, मध्यवर्ती भागात मिरवणूक काढण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. यामुळे आपापल्या मतदारसंघात प्रचारफेरी काढून काही उमेदवारांनी अर्ज दाखल केले. काहींनी छोटेखानी सभा घेत शक्तिप्रदर्शन केले. मनसेकडून वसंत गीते (नाशिक मध्य), नितीन भोसले (नाशिक पश्चिम), संपत जाधव (देवळाली), काँग्रेसतर्फे शाहू खैरे (नाशिक मध्य), दशरथ पाटील (नाशिक पश्चिम), राष्ट्रवादीतर्फे देविदास पिंगळे (नाशिक पूर्व) व शिवाजी चुंबळे (नाशिक पश्चिम), शिवसेनेकडून अजय बोरस्ते (नाशिक मध्य) आदींनी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करताना छगन भुजबळ हे उपस्थित होते. अर्ज भरताना वेगवेगळ्या पक्षांतील इच्छुकांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट झाली. मनसेचे गीते यांनी तर पालकमंत्री भुजबळ यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले. प्रचारात उद्यापासून परस्परांच्या विरोधात राळ उठविणार असलेल्या उमेदवारांनी निवडणुकीसाठी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

सर्वच पक्षांना आपली ताकद कळेल -भुजबळ
आगामी निवडणुकांमध्ये सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढत असल्याने प्रत्येकाला आपली राजकीय ताकद लक्षात येईल. जिल्ह्यात सर्वाधिक जागांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसून येईल असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. काँग्रेससोबतची आमची मैत्री तुटली असून समविचारी पक्षांसोबत निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे. विधानसभेच्या २८८ जागांवर राष्ट्रवादी सक्षम पर्याय देणार आहे. काही जागांवर काँग्रेसने राष्ट्रवादीला विश्वासात न घेता आपले उमेदवार दिल्याने ही मैत्री तुटली असा पुनरुच्चार त्यांनी केला. या निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसे व भाजप स्वतंत्रपणे निवडणुकीस सामोरे जात आहेत. यामुळे प्रत्येकाला आपली राजकीय ताकद अजमावता येईल.

अर्ज भरण्यासाठी आज अखेरचा दिवस
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शनिवार हा अंतिम दिवस आहे. यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी या दिवशी शक्तिप्रदर्शन करून अर्ज भरण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. भाजपची यादी जाहीर न झाल्यामुळे शुक्रवारी या पक्षाकडून फारसे कोणी अर्ज भरले नाहीत. अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी होणार असल्याने निवडणूक व पोलीस यंत्रणेवर कमालीचा ताण पडणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 2:02 am

Web Title: major political parties giants candidates filed nominations
Next Stories
1 सेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीची कसरत
2 प्रचाराच्या कमी कालावधीमुळे उमेदवारांच्या खर्चातही बचत
3 कुंभमेळ्यात पर्यटनविकास साधण्याची संधी
Just Now!
X