काही ठराविक वयोमर्यादेपर्यंत मतिमंद असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात अनेक विद्यालये असली तरी प्रौढ मतिमंदांसाठी मात्र त्यांची संख्या अगदीच जेमतेम. या प्रौढ मतिमंदांचा सांभाळ करण्याप्रमाणेच त्यांच्याकडून काम करून घेणे कठीण. शहरातील रतिबाई मगनलाल जैन पब्लिक ट्रस्ट संचलित प्रौढ मतिमंद विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून गुढीपाडव्याच्या पाश्र्वभूमीवर हे विद्यार्थी तयार करीत असलेल्या गुढय़ा सध्या शहरवासियांच्या आकर्षणाचा विषय ठरल्या आहेत.
समाजाबरोबर धावता येत नाही म्हणून मतिमंदांना रोजगार मिळणे अवघडच परंतु त्यांच्या वाटय़ाला उपेक्षाच अधिक येते. समाजाकडून हेटाळणी होऊ नये, किमान मतिमंदांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यादृष्टिने त्यांना सतत कार्यरत ठेवणे आवश्यक असते. शहरातील देवपूर भागात असलेले मतिमंद विद्यालय नेमके तेच कार्य करीत आहे. या विद्यालयातील विद्यार्थी चार वर्षांपासून प्रत्येक गुढीपाडव्यासाठी गुढय़ा तयार करण्याचे काम करीत आहेत. जैन पब्लिक ट्रस्टचे विश्वस्त प्राचार्य न. म. जैन यांनी सुरू केलेल्या या विद्यालयात विविध वयोगटातील विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांसाठी संस्था नेहमी विविध कार्यक्रम हाती घेत असते. सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धाही घेतल्या जातात. या कार्यक्रमांमधून विद्यार्थी त्यांचे दु:ख विसरून काही क्षण आनंदात घालवितात. तयार केलेल्या गुढय़ांव्दारे विद्यार्थ्यांना पुढे येण्यास प्रेरणा मिळते. हे विद्यार्थी मोठय़ा गुढय़ांसह कार्यालयांमध्ये टेबलावर ठेवता येतील अशा लहान व मध्यम आकाराच्याही गुढय़ा तयार करीत आहेत. या गुढय़ांवर  विद्यार्थ्यांकडून करण्यात येणाऱ्या नक्षीकामामुळे त्या अधिकच आकर्षक दिसतात.
गुढीला लागणाऱ्या कापडावर विद्यार्थी टिकल्या चिटकविण्यासह त्या सर्वागसुंदर दिसण्यासाठी जे काही करता येणे शक्य आहे, ते करतात. गुढी खरी वाटावी म्ङणून त्यात कडूलिंबाच्या पाल्याप्रमाणे हिरव्या रंगाची पाती लावली जातात. ही सर्व कामे प्रौढ मतिमंद मुलांकडून करून घेतली जातात. यासाठी शाळेतील शिक्षकवृंद त्यांना मदत करतात. गेल्या वर्षी तयार झालेल्या गुढय़ा  विदेशातही पाठविण्यात आल्या होत्या.
गुडय़ा बनविण्याचा मुख्य हेतू म्हणजे विद्यार्थ्यांंना कार्यमग्न ठेवणे होय. त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळावा हा आहे. या कामात सर्वच विद्यार्थी एकरुप होतात व गुढय़ा तयार करतात. शहरातील अनेकांनी या उपक्रमाची प्रशंसा करून विद्यार्थ्यांकडून या गुढय़ा खरेदी केल्या आहेत. या विद्यालयातील गुढय़ा खरेदी करून आपल्या नातेवाईकंना किंवा हितचिंतकांना गुढीपाडव्याची भेट म्हणूनही अनेक जण देतात. सुवर्णकार समाजाचे अजय नाशिककर, केले पतसंस्थेच्या सुनंदा केले, डॉ. अनुराधा जोशी यांनी काही गुढय़ा तयार करण्याचे काम विद्यार्थ्यांना दिले आहे. मतिमंदाच्या या उपक्रमास उदंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती विश्वस्त माजी प्राचार्य न. म. जैन, डॉ. जयत शहा, प्रा. संजीव जैन यांनी दिली आहे.