नव्या वर्षांच्या दुसऱ्याच दिवशी दिव्यामध्ये उसळलेल्या प्रवाशांच्या ज्वालामुखीने रेल्वे प्रशासनाला आपल्या मागण्यांची प्रखर झळ आंदोलनाच्या रूपाने पोहोचवली. याची दखल घेऊन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिवा-सीएसटी लोकलच्या मागणीला हिरवा कंदील दाखवला. याच धुमसत्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर सुरेश प्रभू शुक्रवार ९ जानेवारी रोजी ठाणे स्थानकात भेट देणार आहे. या वेळी रेल्वे मंत्र्यांच्या स्वागतासाठी मध्य रेल्वेचे प्रशासन युद्धपातळीवर कामाला सुरुवात केली असून ठाणे स्थानकाच्या रंगरंगोटीला आणि स्थानकाच्या दुरुस्तीला मोठा वेग आला आहे. रेल्वे वाहतुकीचा बोजवारा उडालेला असताना आणि प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असताना रेल्वे प्रशासन स्वागतासाठी मात्र रंगरंगोटीची झालर दरवर्षीच चढवत असते. त्यामुळे केवळ रंगरंगोटी करून त्रुटी झाकण्यापेक्षा धोरणात्मक निर्णय घेऊन रेल्वेच्या व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.

वाहतुकीच्या किमान सुविधेत दिवसभरामध्ये अनेक अडथळे येत असल्याने नियमित वेळापत्रकातील फेऱ्यांची पूर्तता करणे रेल्वे प्रशासनाला अवघड जात असून स्थानकातील किमान सुविधांचाही पुरता बोजवारा उडाला आहे. दिव्यातून लोकल सोडण्याबरोबरच जलद गाडय़ांना दिवा स्थानकात थांबा देण्याची मागणी कित्येक वर्षांपासून दिव्यातील प्रवाशांकडून केली जात होती, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही मागणी अपूर्णच राहत होती. शुक्रवारच्या दिव्यातील रेल रोकोने या सर्व दुर्लक्षाचा आणि अन्यायाचा पुरता हिशेब चुकता केला. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधातील खदखदत्या असंतोषाला वाट मोकळी करून दिली. केवळ मध्य रेल्वेची उपनगरीय रेल्वे वाहतूकच नव्हे तर लांब पल्ल्याच्या वाहतुकीलाही त्याचा मोठा फटका सहन करावा लागला होता. आंदोलनाच्या भडक्याने शासन आणि केंद्रस्तरावरही विशेष दखल घेऊन दिवावासीयांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासने दिले. याच पाश्र्वभूमीवर केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू ठाणे स्थानकाच्या दौऱ्यावर येत आहेत. ठाणे पल्याआडच्या समस्यांचा वेध घेण्याबरोबरच ठाणे स्थानकात नव्याने सुरू करण्यात आलेल्या सुविधांचा लोकार्पण सोहळा या निमित्ताने होणार आहे. त्यामुळे स्थानकाच्या वास्तूमध्ये मोठय़ा प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. रंगरंगोटीचेही काम युद्धपातळीवर करण्यात येत असून त्या दिवशी रेल्वे मंत्र्यांची पुरती सरबराई करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सुरुवात केली आहे. फलाट क्रमांक दोनवरील जुने तिकीट कार्यालय हटवण्यात आले असून त्या ठिकाणी अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसांठी खास वातानुकूलित कक्ष उभारण्यात येत आहे. याशिवाय स्वच्छता आणि रंगरंगोटीची पुरती काळजी घेतली जात आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाकडून मात्र रेल्वे मंत्र्यांच्या कार्यक्रमाची कोणतीही माहिती नसल्याचे सांगत ही देखभाल दुरुस्ती केवळ नियमित उपक्रमाअंतर्गत केले जात आहे, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली.
ठाणे स्थानकात लिफ्ट मिळणार?
ठाणे स्थानकात सरकते जिने उपलब्ध करून देण्यात आले असून जिन्यांबरोबरीनेच स्थानकात प्रवाशांसाठी लिफ्ट उपलब्ध करून दिली जात असून त्याचे काम सुरू आहे. रेल्वे मंत्र्यांच्या स्टेशन भेटीदरम्यान या लिफ्टचेही लोकार्पण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस असून त्या दृष्टीने हे कामही वेगात मार्गी लावले जात आहे.
वाहतुकीची किमान
सुविधा मिळू दे..
पेंटोग्राफ तुटणे, सिग्नल यंत्रणा विस्कळीत, रेल्वे रुळाला तडा, फाटकांचा अडथळा यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सदैव अडथळ्यांची स्पर्धा पार करत आहे. शनिवार आणि रविवारीही मेगाब्लॉकमुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत असते. अशा परिस्थितीमध्ये वाहतुकीची किमान सुविधा देण्यामध्ये रेल्वे प्रशासन अपयशी ठरत असून दिवसभरामधील काही फेऱ्या रद्द करण्याची नामुष्कीही रेल्वे प्रशासनावर येत असते. त्यामुळे वाहतुकीची किमान सुविधा विनाअडथळा मिळूनद्या ही किमान मागणी रेल्वे प्रवासी करत आहेत. रेल्वेमंत्र्यांच्या भेटीमुळे तात्पुरती देखभालदुरुस्ती होत असली तरी ही व्यवस्था कायमस्वरूपी होण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज असल्याची मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

दिवा स्थानक पोलीस छावणी..
दिव्याच्या उद्रेकानंतर दिवा स्थानकातील पोलिसांच्या घडामोडींना मोठी गती आली असून स्टेनगनधारी पोलीस आणि साध्या वेशातील पोलिसांनी दिवा स्थानकाला वेढले आहे. आंदोलनाच्या निमित्ताने रेल्वेच्या संपत्तीची नासधूस करणाऱ्यांविरोधात कारवाईचा फास आवळण्यासाठी रेल्वे पोलीस आग्रही झाले आहेत. तर रेल्वे पोलिसांनी लोकलमधूनही प्रवास करणाऱ्या अशा आदोलकांवरही कारवाई करण्यासाठी विशेष पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.