सध्या सर्वच क्षेत्रात प्रचंड स्पर्धा असून आता शैक्षणिक संस्थांनी स्पर्धा परीक्षेत टिकणारे विद्यार्थी तयार करण्याची आवश्यकता असून त्यासाठी प्रथम शिक्षकांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे बजावली पाहिजे. त्यासाठी मानसिकता तयार करण्याची गरज राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी स्पष्ट केले. आर्णी येथे स्वामी विवेकानंद प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
आर्णी येथे सेवादास बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारा संचालित ही शाळा विनाअनुदानित असतांना संस्थेचे अध्यक्ष राजुदास जाधव यांनी विद्यार्थ्यांसाठी भव्य दिव्य इमारत बांधली असून त्यांचेही मोघे यांनी भाषणातून कौतुक केले.  अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामजी आडे, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष साजीबेग व नगराध्यक्ष अनिल आडे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक राजुदास जाधव यांनी केले, तर आभार आकाश जाधव यांनी मानले.  कार्यक्रमाचे संचालन राजेश उंबरकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रेमदास महाराज, शिक्षण विस्तार अधिकारी इंद्रपाल आडे, मिकमचंद लोया, जिल्हा परिषद पतसंस्थेचे उपाध्यक्ष पवन आत्राम, सचिव राजेंद्र राऊत उपस्थित होते.