डॉ. निलंगेकरांची मूक संमती
निलंगा काँग्रेस कमिटीच्या या ठरावावर लातूर जिल्हय़ात मात्र चर्चा सुरू झाली आहे. काहीजण यावर बोलताना आवर्जून गाण्यातील ओळी गुणगुणतात, ‘अवघे पाऊणशे वयोमान, दंताजीचे उठले ठाणे, फुटले दोन्ही कान’. वयाच्या ८१व्या वर्षी एक ठराव मंजूर होतो आणि त्याला डॉ. निलंगेकरांची मूक संमती असते, याची चर्चा काँग्रेस अंतर्गत होत आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर लातूर जिल्हय़ात लाल दिव्याची गाडी त्यांच्या वारसदाराला मिळेल, अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आमदार डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नाव कार्यकर्त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी पुढे केले आहे. त्यांना मानाचे स्थान मिळावे, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली. विशेष म्हणजे ज्या मेळाव्यात ही मागणी करण्यात आली, त्याचे अध्यक्षस्थानही डॉ. निलंगेकर यांनीच भूषविले.
महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालयात आयोजित मेळाव्याप्रसंगी डॉ. निलंगेकर यांच्या पक्षनिष्ठेची व कार्याची दखल घेऊन त्यांना आगामी मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाची जबाबदारी देण्यात यावी, असा ठराव निलंगा तालुका काँग्रेस कमिटीने मंजूर केला. या मेळाव्याप्रसंगी  जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर, डॉ. शरद पाटील निलंगेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडितराव धुमाळ, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संभाजी पाटील, नगराध्यक्ष सुनीता चोपणे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध गावचे सरपंच उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळण्यापूर्वी शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी मंत्रिमंडळात पाटबंधारे व महसूल विभागाचा कारभारही सांभाळला होता. पाऊणशे वयोमान उलटून गेल्यानंतर ते कार्यकर्त्यांना आवर्जून सांगायचे, ‘तसे मला निवडणूक लढविण्याची अजिबात इच्छा नाही. पण काँग्रेस सोनिया गांधी यांनी आग्रह केला म्हणून निवडणुकीला उभा राहिलो.’ या त्यांच्या वाक्याचा संदर्भ आता कार्यकर्ते घेत आहेत. जर निवडणूक लढवायला त्या सांगतात, तर मंत्रिपदही त्यांच्याकडे द्यायला हवे, यासाठीही सोनिया गांधी यांनीच प्रयत्न करावेत, अशी चर्चाही सुरू झाली आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तारात डॉ. निलंगेकरांचा समावेश करावा, असा ठराव संभाजीराव पाटील यांनी मांडला. त्यास पंडितराव धुमाळ यांनी अनुमोदन दिले. हा ठराव सर्वानुमते मान्य करण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांनी टाळय़ांचा गजर केला. काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे, यासाठी तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना ठराव घ्यावा लागतो, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.