हेमांगी कवी
बॉर्न अ‍ॅण्ड ब्रॉटअप इन ठाणे’ असं अभिमानाने सांगणारे असंख्य ठाणेकर भेटतील. अशाच ठाणेकरांपैकी एक असलेली अभिनेत्री हेमांगी कवी हिचा जन्म ठाणे शहरातच झाला. कळवा येथील मनीषानगरसमोरच्या परिसरात लहानपणापासून वाढलेली हेमांगी अस्सल ठाणेकर आहे. हेमांगी कवी सांगतेय ठाणे शहराविषयी आणि आपल्या आवडीच्या गोष्टींविषयी..
* आवडता चित्रपट – अग्ली
* आवडतं नाटक – ठष्ट
* आवडतं गाणं – लग जा गले
* शॉपिंगचं आवडतं ठिकाण –  नौपाडय़ातील कोणतंही दुकान
* आवडता फुडजॉइण्ट्स – राजमाता वडापाव
* आवडता पिकनिक स्पॉट – टिकूजिनीवाडी
* ठाण्यातील एखादी संस्मरणीय घटना :
आजच्या गजबजलेल्या आणि विस्तारलेल्या ठाणे शहरात निवासी सकुलांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलीय. ठाणे-कळवा परिसरातील रस्त्यांवर अहोरात्र वर्दळ दिसते. परंतु, १५-१६ वर्षांपूर्वी रात्री दहानंतर रस्त्यावर फारशी वर्दळ कधीच दिसत नसे. मी रंगभूमीवर काम करायला तेव्हा नुकतीच सुरुवात केली होती. गडकरी रंगायतन नाटय़गृहातील रात्री उशिरा संपलेला प्रयोग करून घरी निघाले होते. कळव्याला जाण्यासाठी गडकरी रंगायतनच्या बाहेर रिक्षा नव्हती. बराच वेळ पाहून शेवटी जांभळी नाक्यापर्यंत चालत चालत पोहोचले तरी रिक्षा कुठेच मिळाली नाही. म्हणून कळव्याच्या दिशेने आणखी थोडे पुढे गेल्यानंतर तरी रिक्षा मिळेल अशी शक्यता मनात बाळगत टेंभी नाक्यापर्यंत चालायला सुरुवात केली. रात्रीचे अकरा वाजून गेले होते, सगळीकडे नीरव शांतता पसरली होती, तुरळक वाहनं ये-जा करताना दिसत होती, परंतु रस्ता संपूर्ण निर्मनुष्य होता. त्यात प्रयोग उरकून लवकर घरी जात असल्यामुळे चेहऱ्यावरचा मेकअपही दिसत होता. रिक्षा मिळेल या आशेने टेंभी नाक्यावर चालत जात असतानाच पोलिसांची जीप दिसली. मेकअप दिसत असल्यामुळे पोलिसांनी थांबून विचारणा केली. कळव्याला जाण्यासाठी रिक्षा शोधतेय म्हटल्यावर पोलिसांनी थांबून माझ्यासाठी रिक्षा मिळवून द्यायचा प्रयत्न केला. परंतु, प्रवाशांनी भरलेल्या रिक्षा जात होत्या, त्यामुळे थांबायला कोणी तयार नव्हते. अखेरीस पोलिसांनी आपल्या जीपने मला घरी सोडले. मुंबई शहरात
रात्री घरी जाताना भीती वाटते, पण अशी भीती ठाण्यात वाटत नाही.
ठाणे पोलिसांनी केलेली मदत कायम माझ्या लक्षात राहिली आहे. मुंबईच्या तुलनेत ठाणे हे खूपच सुरक्षित शहर नक्कीच आहे हे आवर्जून नमूद
केले पाहिजे.
शब्दांकन — सुनील नांदगावकर