News Flash

शीव-पनवेल महामार्गावरील काँक्रीटीकरणावर प्रश्नचिन्ह

नवी मुंबईतून सर्वाधिक अंतराने जाणाऱ्या शीव-पनवेल द्रुतगती महामार्गावरील वाहतूक मंगळवारपासून सुरळीत सुरू झाली असून या मार्गावर रस्ता रुंदीकरण आवश्यक होते.

| July 3, 2014 01:31 am

शीव-पनवेल महामार्गावरील  काँक्रीटीकरणावर प्रश्नचिन्ह

नवी मुंबईतून सर्वाधिक अंतराने जाणाऱ्या शीव-पनवेल द्रुतगती महामार्गावरील वाहतूक मंगळवारपासून सुरळीत सुरू झाली असून या मार्गावर रस्ता रुंदीकरण आवश्यक होते. पण मोठय़ा प्रमाणात झालेले सिमेंट काँक्रीटीकरण गरजेचे होते का, असा सवाल वाहनचालक आता उपस्थित करू लागले आहेत. या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या थरामुळेच या महामार्गाचा खर्च १२०० कोटीच्या घरात गेला असून तो वसूल करण्यासाठी वाहनचालकांच्या खिशाला हात घातला जाणार आहे. यामुळे रस्ता कंत्राटदार कंपनीचं चांगभलं होणार आहे. मुंबईत प्रवेश करताना द्यावा लागणाऱ्या टोलइतकाच हा खर्च असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईहून पुणे-गोवा मार्गाकडे जाताना वाहनचालकांचा जास्तीत जास्त वेळ हा मानखर्द ते पनवेल या मार्गावर वाहन चालविताना जात होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने अडीच वर्षांपूर्वी या रस्ताचे ‘बांधा वापरा हस्तांतरण करा’ या तत्त्वावर काम काढले. हे काम एक हजार २२९ कोटीच्या घरात गेले आहे. या कामात रस्त्याचे रुंदीकरण, पाच उड्डाण पुलांची निर्मिती, भुयारी व उन्नत मार्ग, रस्त्याच्या जवळची गटारे, पदपथ, दिवे या कामांचा समावेश आहे. या स्थापत्य कामात सर्वाधिक खर्च हा उड्डाणपूल आणि सिमेंट काँक्रीटीकरणावर झाला आहे. यात सिमेंट काँक्रीटचा १७ किलोमीटरचा रस्ता बनविण्यात आला असून ह्य़ा रस्त्याची खरोखरच गरज होती का, असा सवाल आता वाहनचालकच विचारत आहेत. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यामुळे खर्चात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून त्याचा खर्च आता वाहनचालकाच्या खिशातून काढला जाणार आहे. या मार्गावर दिवसागणिक होणारी दीड लाख वाहनांची वाहतूक पाहता या रस्त्याचे रुंदीकरण व्हावे अशी वाहतूक पोलिसांचीदेखील इच्छा होती, पण त्या रस्त्याचे एवढय़ा प्रमाणात सिमेंट काँक्रीटीकरण करणे आवश्यक होते का असा प्रश्न त्यांनादेखील पडला आहे. या मार्गावर मुंबईत प्रवेश करताना द्यावे लागणारे कमीत कमी ३० आणि जास्तीत जास्त १५० रुपये टोल बसण्याची शक्यता आहे. निविदेत सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचा अंतर्भाव केल्याने खर्चाचा आकडा १२०० कोटीच्या घरात गेला आहे. सिमेंट काँक्रीटीकरण टाळले गेले असते तर वाहनचालकांच्या खिशाला पडणारी चाट काही प्रमाणात कमी झाली असती असे एका पोलीस अधिकाऱ्याचे मत आहे. या मार्गावर मानखुर्द, सानपाडा, उरण फाटा, कामोठे आणि तळोजा येथे पाच उड्डाण पूल बांधण्यात आले आहेत. त्यामुळेच या मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार आहे. पण २३ किलोमीटरच्या मार्गात सिमेंट काँक्रीटचे थर हे वाहनचालकांच्या खिशाला भोक पाडण्यासाठी रचण्यात आल्याची टीका आता होऊ लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2014 1:31 am

Web Title: making of cement concrete of sion panvel highway under scanner
टॅग : Sion Panvel Highway
Next Stories
1 शहरामध्ये पहिल्याच दिवशी ७१ मिमी पावसाची नोंद
2 उरणकर सुखावले
3 विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी गुरुवारपासून विशेष मेट्रो सेंटर
Just Now!
X