News Flash

मुलाखतीनंतर भाजपच्या इच्छुकांमध्ये खदखद

महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने वातावरणनिर्मितीत आघाडी घेतली असली तरी इच्छुकांच्या मुलाखतींवरूनच पक्षात खदखद व्यक्त होऊ लागली आहे.

| November 6, 2013 01:45 am

महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने वातावरणनिर्मितीत आघाडी घेतली असली तरी इच्छुकांच्या मुलाखतींवरूनच पक्षात खदखद व्यक्त होऊ लागली आहे. प्रामुख्याने पक्षाच्या निष्ठावान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इच्छुकांचाच त्यात समावेश आहे.
अन्य पक्षांच्या तुलनेत भाजपने मागच्याच आठवडय़ात इच्छुकांच्या मुलाखती घेऊन वातावरणनिर्मितीत आघाडी घेतली. ६८ प्रभागांसाठी पक्षाकडे तब्बल १२७ जणांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या. पक्षाच्या स्थानिक संसदीय मंडळाचे सदस्य खासदार दिलीप गांधी, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे आणि शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. वाजतगाजत शक्तिप्रदर्शन करीत इच्छुकांनी पक्षनेत्यांचा मनसुबा नेमकेपणाने हेरला. त्यातूनच पक्षाने वातावरणनिर्मितीत आघाडी घेतली. या इच्छुकांमध्ये अन्य पक्षांतीलही काहींचा समावेश आहे. या गर्दीने एकीकडे नेते हुरळून गेले असले तरी दुसरीकडे या मुलाखतीच असंतोषाला निमंत्रण देणाऱ्या ठरल्या आहेत.
दोन दिवस पक्षाच्या मुलाखती चालल्या. इच्छुकांच्या गर्दीची चर्चा दोन दिवस सुरू होती. मात्र ती आता ओसरली असून त्याची जागा खदखदीने घेतली आहे. प्रामुख्याने पक्षात आता जुने आणि नवे असा वाद उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मुलाखतकारांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांचा रोख हाच या खदखदीचे कारण ठरल्याचे समजते. त्यासाठी आमदार कर्डिले यांच्याकडेच बोट दाखवले जाऊ लागले आहे. अनेक इच्छुकांनी ही नाराजी बोलून दाखवली. पक्षनिष्ठ आणि निवडून येण्याची क्षमता हे महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवूनच जुन्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात आल्याची तक्रार करण्यात येते. काही इच्छुकांनी अशा प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिल्याचेही समजते. त्यावरून या मुलाखतींच्या वेळीच वादंगही झाल्याचे समजते.
दरम्यान, या मुलाखतींच्या आधारावर प्रभागनिहाय अहवाल बनवण्याचे काम भाजपत सुरू असून, त्यानंतर मित्रपक्ष शिवसेनेशी युती व जागावाटपाच्या बोलणीची भूमिका भाजपने घेतली आहे. त्यासाठी येत्या एक-दोन दिवसांत पक्षाच्या स्थानिक संसदीय समितीची पुन्हा बैठक होणार असून, त्यातील चर्चेअंती शिवसेनेकडे निम्म्या जागांचा दावा केला जाण्याची शक्यता आहे. मात्र मुलाखतीमधील रोख लक्षात घेता युतीबाबतच कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता व्यक्त होऊ लागली आहे. या सगळय़ा मोर्चेबांधणीत युतीची चर्चाही लांबणीवर चालली आहे. त्यामुळे शिवसेनेतही अस्वस्थता व्यक्त होते. मात्र युती आणि जागावाटपात याआधी शिवसेनेने निमंत्रण दिले होते, आता भाजपकडून बोलावणे आल्याशिवाय यावर भाष्य न करण्याची भूमिका शिवसेनेने घेल्याचेही समजते.           

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 1:45 am

Web Title: malaise in bjp willing after interviews
Next Stories
1 जि. प. कर्मचा-यांचा आंदोलनाचा इशारा
2 तात्यासाहेब कोरे हे द्रष्टे समाजसुधारक-राज्यपाल
3 लाचप्रकरणी आता आर्थिक मध्यस्थी करणाऱ्यांवरही कारवाई- श्रीहरि पाटील
Just Now!
X