सुरुवातीला जागावाटप आणि आता निकालाचे पडसाद, भारतीय जनता पक्ष-शिवसेनेत राजकीय कलगीतुरा सुरूच आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर या मित्रपक्षांमधील बेदिली अधिक तीव्रतेने उफाळण्याचीच चिन्हे आहेत. भाजपने अद्यापि त्यावर भाष्य केले नसले तरी शिवसेनेने मात्र पराभवास भाजपलाच जबाबदार धरले आहे. शिवाय शिवसेनेतील अंतर्गत धुसफूसही चव्हाटय़ावर आली आहे.
गेली पंचवीस वर्षे युती हातात हात घालून कार्यरत आहे, मात्र या मनपा निवडणुकीत या मित्रपक्षांचे सूर जुळलेच नाही. सुरुवातीलाच जागावाटपावरून उडालेल्या ठिणग्यांच्या पुढे प्रचारात ज्वाळाच झाल्या. त्याची धग निकालानंतरही पुन्हा जाणवू लागली आहे. मनपा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला अपयशाचा सामना करावा लागला. शिवसेनेच्या २ व भाजपच्या ३ अशा एकूण ५ जागा कमी झाल्या. मात्र त्यांचे दोघांचे मिळून ४ अपक्ष विजयी झाले आहेत. असे असले तरी या निकालाचे पडसाद पुन्हा जाणवू लागले आहेत.
शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांनी युतीच्या पिछेहाटीला भाजपलाच जबाबदार धरले आहे. त्यांचे चुकीचे निर्णय आणि चुकीच्या उमेदवारांमुळे दोघांना फटका बसल्याचा आरोप त्यांनी केले आहे. त्यांच्या या खेळय़ांमुळेच युतीचे एकसंघ चित्र निर्माण होऊ शकले नाही असे त्यांनी म्हटले आहे. भाजपने मात्र निवडणुकीच्या निकालावर सावध प्रक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी अजूनही थेट भाष्य केलेले नाही.
दरम्यान, निवडणूक निकालाचे शिवसेनेतही प्रमुखांमध्येच संघर्षांचे पडसाद उमटले आहेत. पक्षाचे जिल्हाप्रमुख (दक्षिण) शशिकांत गाडे यांनी त्यांचे चिरंजीव योगिराज (प्रभाग ११) पराभवला राठोड यांना जबाबदार धरले आहे. या प्रभागात शिवसेनेने बंडखोरी केली होती. पक्षाचे अशोक दहिफळे अपक्ष रिंगणात उतरले होते. दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्डय़ात राठोड हेच पडले असून, विक्रम राठोड यांचा पराभव हे त्याचेच द्योतक आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींशीच आपण चर्चा करणार आहोत असे गाडे यांनी सांगितले.