आगामी आर्थिक वर्षांसाठी महापालिका प्रशासनातर्फे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात आठ कोटींची वाढ व किरकोळ किरकोळ दुरूस्त्या करत ३८४.२३ कोटीच्या अंदाजपत्रकास स्थायी समितीने मान्यता दिली.कोणतीही करवाढ नसलेल्या या अंदाजपत्रकात १७ लाखाची रक्कम शिल्लक दर्शविण्यात आली आहे. आगामी सर्वसाधारण सभेत या अंदाजपत्रकावर चर्चा होऊन अंतीम मंजुरी देण्यात येणार आहे.
आयुक्त अजीत जाधव यांनी ३७६ कोटी २३ लाखाचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. त्यात कोणतीही करवाढ सुचविण्यात आलेली नाही. जकात बंद झाल्याने महापालिकेच्या उत्पन्नात होणाऱ्या तुटीमुळे विकास कामांवर परिणाम होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली असून त्यासाठी उत्पन्नाचे पर्यायी मार्ग शोधण्यात आल्याचे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले. शहरात ठिकठिकाणी व्यापारी संकुले उभारण्यात येत असल्याचे त्यांनी नमुद केले. शहरातील मोसम पूल चौक आणि नव्या बसस्थानक परिसरात वाहतुकीचा प्रचंड कोंडी होत असते. ही समस्या सोडविण्यासाठी या दोन्ही ठिकाणी उड्डाण पुलांची निर्मिती करण्यात येणार आहे. ही कामे पारगमन शुल्क वसुल करणाऱ्या अभिकर्त्यांच्या देकार रकमेतून केली जातील. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामाचा केंद्र शासनाच्या ‘यूआयडीएसएसटी’ योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यात केंद्राचे ८० टक्के तर राज्य शासनाचे १० टक्के अनुदान प्राप्त होणार आहे. सदर योजना केंद्र शासनाच्या मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आयुक्त जाधव यांनी दिली. प्रशासनातर्फे सुचविण्यात आलेल्या अंदाजपत्रकावर अध्यक्ष इरफान अली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. त्यात प्रशासनाने गृहीत धरलेल्या ६२ कोटीच्या स्थानिक संस्था कराच्या उत्पन्नात आठ कोटीची वाढ करण्यात आली.
तसेच वाहनभाडे खर्चात कपात सुचवून एक कोटीवरून तो ५० लाखावर आणण्यात आला. अन्य काही किरकोळ दुरूस्त्या करून ३८४.२३ कोटीच्या अंदाजपत्रकात स्थायीने मंजुरी दिली. यावेळी शिक्षण मंडळाच्या ७२ कोटी ९९ लाख ८४ हजाराच्या अंदाजपत्रकासही मान्यता देण्यात आली. बैठकीस समितीच्या पंधरापैकी चौदा सदस्यांसह उपायुक्त राजेंद्र फातले, सहाय्यक आयुक्त विजय पगार, लेखाधिकारी कमरूद्दिन शेख, शहर अभियंता कैलास बच्छाव आदी उपस्थित होते.

वार्ताहर, मालेगाव