22 September 2020

News Flash

धुळे मतदारसंघावर मालेगावचा प्रभाव

धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक कमालीची रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसत असून मागील निवडणुकीप्रमाणे या वेळीही मालेगाव शहर व तालुक्याची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता सध्या सुरू असलेल्या

| March 29, 2014 01:05 am

धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक कमालीची रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसत असून मागील निवडणुकीप्रमाणे या वेळीही मालेगाव शहर व तालुक्याची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता सध्या सुरू असलेल्या राजकीय हालचालींमुळे व्यक्त होत आहे. मागील निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेस आघाडीचे अमरिश पटेल हे मालेगावमधील अल्पसंख्याकांची एकगठ्ठा मते आपणाकडे वळावीत म्हणून काँग्रेससह इतरही पक्षांच्या नेत्यांना आग्रह करत आहेत. तर महायुतीकडून उमेदवारीसाठी इच्छुक परंतु उमेदवारी न मिळाल्याने काहीसे नाराज असलेले अद्वय हिरे यांनी अखेर नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत या कारणासाठी महायुतीच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महायुतीच्या गोटात समाधान पसरत असतानाच सत्यजितराजे गायकवाड हे काँग्रेसचे इच्छुक उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. गंमत म्हणजे त्यांची बंडखोरी काँग्रेसच्या पथ्यावर तर महायुतीसाठी घातक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अलीकडेच काँग्रेसचे उमेदवार अमरिश पटेल यांनी मालेगाव येथे पत्रकार परिषद घेऊन केवळ विकासाच्या मुद्दय़ावर निवडणूक लढवत असल्याची भूमिका मांडत मतदारांनी प्रतिनिधित्व  करण्याची संधी दिल्यास विकासापासून दूर राहिलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघात ‘शिरपूर पॅटर्न’प्रमाणे विविध विकास प्रकल्प राबविण्याची ग्वाही दिली. गत वेळी भाजप उमेदवार प्रतापदादा सोनवणे यांच्याकडून पराभूत झालेल्या पटेल यांना काँग्रेसने दुसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरविले आहे. मालेगाव शहरात नुकत्याच झालेल्या बैठकीत पक्ष कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेताना निवडणूक लढविण्यामागची आपली भूमिका त्यांनी मांडली. जलसंधारणासाठी राबविलेल्या प्रयोगांमुळे शिरपूर तालुक्यात किमान पंधरा हजार हेक्टर कोरडवाहू क्षेत्र सिंचनाखाली आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यंत्रमाग क्षेत्रात आठ हजार जणांना तर गारमेंट उद्योगात पाचशेहून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध झाल्याचा दावा त्यांनी केला. मालेगाव, सटाणा, धुळे व शिंदखेडा या तालुक्यांमध्ये मोठय़ा उद्योगधंद्यांची उभारणी करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच मनमाड-मालेगाव-इंदूर रेल्वेमार्ग, यंत्रमाग व्यवसायाचे आधुनिकीकरण, मालेगाव जिल्हानिर्मिती यासारखे दीर्घकाळापासून रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी देखील प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.
मागील निवडणुकीत धर्मनिरपेक्ष जनता दलाकडून उमेदवारी केलेले निहाल अहमद यांनी लाखापेक्षा अधिक मते घेतल्यानेच पटेल यांना पराभव पत्करावा लागल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या वेळी मालेगाव शहरातील एकगठ्ठा मते आपल्या पारडय़ात पडावीत यासाठी पटेल यांनी प्रयत्न सुरू केले असून ते वारंवार मालेगावी भेट देऊन विविध नेत्यांच्या भेटी घेत आहेत. मागील निवडणुकीत त्यांच्यासाठी त्रासदायक ठरलेले निहाल अहमद यांची भेट  घेऊन त्यांचा सशर्त पाठिंबा मिळविण्यात त्यांना यश आले आहे.
दुसरीकडे भाजपकडून उमेदवारीसाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील असलेले अद्वय हिरे यांनी नाराजी असली तरीही महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे समर्थकांच्या मेळाव्यात जाहीर केले. हिरे यांची ही भूमिका महायुतीसाठी लाभदायक ठरणार असताना काँग्रेसचे नेते सत्यजित गायकवाड यांनी बंडखोरीची तयारी सुरू केली आहे.
समर्थकांच्या मेळाव्यात त्यांनी यासंदर्भात घोषणा केल्यानंतर खरे तर काँग्रेसच्या गोटात खळबळ उडावयास हवी होती, परंतु उलट महायुतीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. गायकवाड हे मालेगाव तालुक्यातील कौळाणे येथील मूळ रहिवासी असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील मते त्यांच्या बाजूने वळू शकतात. भाजप उमेदवार सुभाष भामरे यांचाही विशेष भर ग्रामीण भागातील मतदारांवरच आहे. त्यामुळे या मतदारांमध्येच गायकवाड आणि भामरे हे दोन वाटेकरी निर्माण झाल्यास त्याचा थेट लाभ पटेल यांना होऊ शकतो अशी भीती महायुतीला आहे. त्यामुळे गायकवाड यांची बंडखोरी रोखणे हे काँग्रेसपेक्षा महायुतीला अधिक आवश्यक झाले असून त्यादृष्टीने त्यांचे पदाधिकारी कामाला लागले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2014 1:05 am

Web Title: malegaon impact on dhule constituency
Next Stories
1 काँग्रेसचा गनिमी कावा : डॉ. गावितांविरोधात अजित पवारांच्या सभा
2 ‘नाटो’ साठी अनिल गोटे जनजागृती करणार
3 एकनाथ खडसे-गिरीश महाजन भेटीत मतभेद संपविण्यावर भर
Just Now!
X