विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आता पूर्ण झाली असून ठाणे जिल्ह्य़ात ४५ टक्के महिला मतदार असूनही उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या महिलांची संख्या अवघी चार टक्के आहे. निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल हे १९ ऑक्टोबरला कळणार नसले तरी किमान ठाण्यात तरी विजय पुरुषप्रधान संस्कृतीचाच होणार हे आताच स्पष्ट झाले आहे. जिल्ह्य़ातील १८ मतदारसंघांमध्ये एकूण ३८२ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून त्यामध्ये केवळ १८ महिलांचे अर्ज आहेत. त्यातही काही अर्ज डमी उमेदवारांचे आहेत. निम्म्या मतदारसंघांमध्ये तर एकही महिला उमेदवार नाही. मनसे आणि भाजपने प्रत्येकी एका ठिकाणी महिलांना उमेदवारी दिली आहे. अन्य पक्षांनी मात्र महिला उमेदवारांना जाणीवपूर्वक टाळले असल्याचे आरोप आता होऊ लागले आहेत. यावरून महिला सबलीकरणच्या बाता मारणाऱ्या पक्षांचे वास्तव समोर आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे स्थानिक सत्ताकारणात पुरुषांच्या बरोबरीने महिला दिसू लागल्या आहेत. मात्र विधानसभा अथवा लोकसभेसाठी असे कोणतेही आरक्षण नाही. त्यामुळे या निवडणुकांमध्ये उमेदवारी देताना महिला कार्यकर्त्यांकडे राजकीय पक्ष सपशेल दुर्लक्ष करतात. राजकारणातील या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे अनेक ठिकाणच्या इच्छुक आणि सक्षम महिलांवर अन्याय होतो. ठाणे जिल्ह्य़ातून ५९ लाख १ हजार ७३२ मतदार मतदान करणार असून त्यापैकी महिला उमेदवारांची संख्या २६ लाख ५७ हजार ५०९ म्हणजे ४५ टक्के इतकी आहे. मात्र या महिलांना प्रतिनिधित्व देताना मात्र पक्षांनी हात आखडता घेतला आहे. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून मनसेच्या सेजल कदम, तर बेलापूर मतदारसंघात भाजप पक्षाकडून मंदा म्हात्रे यांना उमेदवारी आहे; तर ऐरोलीमध्ये सुषमा प्रमोद दांडे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र इथे अन्य दोन उमेदवारांनीही भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मतदारसंघामध्ये महिला उमेदवार देण्यात आलेला नाही.

पुरुष उमेदवारांच्या
पत्नींचे उमेदवारी अर्ज
अनेक मतदारसंघांमध्ये पुरुष उमेदवारांच्या पत्नींनी डमी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यामध्ये ओवळा-माजिवडा मतदारसंघातून लढत असलेल्या प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा सरनाईक आणि मनसेच्या सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी सुलेखा चव्हाण यांनी डमी उमेदवारी अर्ज भरले आहेत; तर मिरा भाइंदर मतदारसंघातून भाजपकडून लढणाऱ्या नरेंद्र मेहता यांच्या पत्नी सुमन मेहता यांनी अर्ज भरला आहे. भिवंडीमध्ये शिवसेनेचे शांताराम मोरे यांच्या पत्नी आशा मोरे यांनी डमी अर्ज भरला आहे.