महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत सोलापूर जिल्हय़ाचा निकाल ७४.७७ टक्के इतका लागला असून, यात परंपरेप्रमाणे मुलांपेक्षा मुलींनीच आघाडी घेतल्याचे दिसून येते. तर तालुकानिहाय परीक्षा निकालात माळशिरस तालुक्याने बाजी मारली आहे.
बारावीच्या परीक्षेला जिल्हय़ातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांतून ४१ हजार १८९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३० हजार ७९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात २४ हजार ८५२ मुलांपैकी १७ हजार २४५ उत्तीर्ण झाले, तर १६ हजार ३३७ मुलींपैकी १३ हजार ५५४ मुली यशस्वी झाल्या आहेत. मुलांच्या यशस्वितेचे प्रमाण ६९.३९ टक्के तर मुलींच्या उत्तीर्ण प्रमाण ८२.९७ टक्के एवढे आहे.
या परीक्षेत शास्त्र विभागाचा निकाल ८६.२२ टक्के तर वाणिज्य विभागाचा निकाल ६९.०५ टक्के इतका आहे. कला शाखेचा निकाल ६५.४२ टक्के इतका आहे. तर व्यावसायिक शिक्षणाचा निकाल तब्बल ९२.३९ टक्के इतका लागला आहे.
जिल्हय़ात तालुकानिहाय बारावी परीक्षेचा निकाल पाहता यात सर्वाधिक ८२.८८ टक्के निकाल घेऊन माळशिरसने बाजी मारली आहे. तर त्या खालोखाल मोहोळ (८४.२५ टक्के) तालुक्याने आघाडी घेतली आहे. बार्शी-७८.७२, करमाळा-७७.९४, पंढरपूर-७७.०५, मंगळवेढा-७६.८६, सांगोला-७३.७३, अक्ककोट-७१.३८ व सोलापूर शहर-६८.८७ टक्के याप्रमाणे निकाल लागला आहे.