भोईवाडा पोलिसांनी नुकतीच एका भामटय़ाला अटक  केली आहे. त्याने पंचतारांकित हॉटेलचा व्यवस्थापक असल्याचे भासवून व्यापाऱ्याला गंडा घातला होता.
नरेंद्र शर्मा (४८) असे या भामटय़ाचे नाव आहे. वर्मा मूळ पुण्यात राहणारा. तो उच्चशिक्षित असून त्याची पत्नी शिक्षिका आहे. मात्र शर्मा फसवणुकीकडे वळला. गेल्या अनेक वर्षांपासून तो मोठमोठय़ा व्यापाऱ्यांना गंडा घालत असे. फोर्ट येथे रमेश पुरोहित यांचा घाऊक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी पुरोहित यांना एक फोन आला. ‘मी परळच्या आयटीसी ग्रँड या हॉटेलचा व्यवस्थापक रवी कपूर बोलतोय’, अशी ओळख फोनवरून बोलणाऱ्याने करून दिली. मला विविध कंपन्यांच्या एकूण १ हजार ओरिजनल मोबाईल बॅटऱ्या हव्या आहेत, असे सांगितले. या सर्व बॅटऱ्या तात्काळ हव्या आहेत, असेही त्याने सांगितले.
एवढी मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर पुरोहित खुश झाले. पण त्यांच्याकडे त्यावेळी केवळ साडेसातशेच बॅटऱ्या होत्या. असतील तेवढय़ा बॅटऱ्या घेऊन येण्यास कपूरने सांगितले. कपूर ऊर्फ शर्मा याने पुरोहित यांना थेट याच पंचतारांकित हॉटेलात बोलावल्याने संशयाला काहीच वाव नव्हता. शर्मा आपल्या एका कर्मचाऱ्याला घेऊन या हॉटेलात गेले. तेथे शर्माने पुरोहितसोबत आलेल्या कर्मचाऱ्याला बाहेर थांबवले आणि पुरोहितना घेऊन तो वर गेला. तेथे चहापान केले आणि सामानाचे इनव्हॉईस देण्यास सांगितले.
एकूण सर्व माल सुमारे अडीच लाख रुपयांचा होता. मी आता लगेच पैसे आणतो असे सांगून इनव्हॉईस मागितले. पुरोहित यांनी मालाचे इनव्हॉईस दिले. त्यानंतर शर्मा लगेच खाली आला आणि खाली उभ्या असलेल्या कर्मचाऱ्याला ते दाखवून त्याच्याकडील माल एका टॅक्सीत ठेवला आणि तेथून पळ काढला.
वर बसलेले पुरोहित बराच वेळ रवी कपूर उर्फ नरेंद्र शर्मा याची वाट बघत बसले होते. त्याचा फोनही नंतर बंद होता. त्यानंतर ते कंटाळून खाली आले. तेथे आपला कर्मचारी भेटल्यावर त्यांना सारा प्रकार लक्षात आला. त्यांनी लगेच हॉटेलात चौकशी केली तेव्हा अशा नावाचा आमचा कुणी व्यवस्थापक नसल्याचे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मग भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
भोईवाडा पोलिसांनी मोबाईल टॉवर लोकेशन आणि सीसीटीव्ही चित्रणाचा आधार घेऊन आरोपीची ओळख पटवली. नरेंद्र शर्मा हा सराईत गुन्हेगार असल्याचे लक्षात आले. त्यानंतर सापळा लावून त्यांनी त्याला अटक केली. शर्मा याच्या नावावर वांद्रे, वरळी, कफपरेड, कुलाबा सहार आदी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तोंडवळकर यांनी सांगितले.
शर्माने लंपास केलेल्या बॅटऱ्या दोघांना विकल्या होत्या. त्यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यापैकी काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शर्मा अशापद्धतीने फसवणूक करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘जस्ट डायल’मधून तो व्यापाऱ्यांचे मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधत असे.
भोईवाडा पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विशाल गायकवाड, पोलीस हवालदार विश्वास भोसले, सचिन घाडगे, अरूण वाडिले, प्रितेश शिंदे आणि राजा गायकवाड आदींच्या पथकाने शर्माला अटक केली.