News Flash

मन मे लड्डू फुटा..

पहिल्यांदाच ऑडिशनला गेल्यावर मला संवाद म्हणायचा होता, ‘मेरा बाप कौन है?’ असा अतरंगी संवाद मिळाल्यावर मी तो खास माझ्या शैलीत म्हटला आणि दुसऱ्याच दिवशी मला

| July 7, 2013 10:42 am

जाहिरातीच्या ऑडिशनसाठी लागणाऱ्या रांगा आणि तिथे आपला नंबर लागेल की नाही या भीतीने प्रसाद बर्वे या क्षेत्राकडे ढुंकूनही पाहत नव्हता. एका मैत्रिणीच्या आग्रहास्तव त्याने ऑडिशन दिली आणि प्रसाद बर्वेच्या नावावर ‘मन में लड्डू फुटा’ ही ‘कॅडबरी शॉट्स’ची जाहिरात जमा झाली. या जाहिरातीने प्रसादला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आणि अल्पावधीत त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले.

पहिल्यांदाच ऑडिशनला गेल्यावर मला संवाद म्हणायचा होता, ‘मेरा बाप कौन है?’ असा अतरंगी संवाद मिळाल्यावर मी तो खास माझ्या शैलीत म्हटला आणि दुसऱ्याच दिवशी मला ‘तुमची निवड झालीय’, असा फोन आला. अशा पद्धतीने माझा जाहिरात क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. माझी खऱ्या अर्थाने ओळख निर्माण झाली ती मला मिळालेल्या ‘मन में लड्डू फुटा..’ या कॅडबरी शॉट्सच्या जाहिरातीमुळे. याच जाहिरातीने मला खरोखर ग्लॅमर मिळवून दिले. त्यानंतर आजतागायत मी जवळपास २५ नामांकित ब्रॅंड्सच्या जाहिराती केल्या आहेत.
जाहिरात क्षेत्राकडे आज अनेकजण केवळ ग्लॅमर आहे म्हणून वळलेले दिसतात. या क्षेत्रात उत्तम पैसा आहे, पण त्याबरोबरीने मेहनतीला पर्याय नाही. केवळ तीस सेकदांत तुम्हाला इथे स्वत:ला अभिनयाच्या जोरावर सिद्ध करायचं असतं. प्रत्येक दिग्दर्शकाची काम करण्याची शैली वेगळी असते, त्यानुसार तुम्हाला तुमची तयारी करावी लागते. काही दिग्दर्शक तर अक्षरश: ‘स्टॉप वॉच’ घेऊनच कामाला बसतात. निव्वळ चकचकाट या क्षेत्रात नाही, तर इथे खूप साऱ्या सर्जनशील गोष्टींचा खजिना आहे. तुम्हाला खूप गोष्टी शिकता, पाहता आणि अनुभवता येतात. मला या क्षेत्राने विचारांच्या दृष्टीने खूप प्रगल्भ केलेलं आहे. किती बारीक गोष्टींना महत्त्व देऊन सर्जनशीलतेने जाहिरात केली जाते याचा किस्सा तुम्हाला मी सांगतो. एका जाहिरातीमध्ये समोरचा माणूस मला कानाखाली मारतो, असे दृश्य होते. त्याचे जवळपास पाच ते सात वेळा रिटेक झाले. शेवटी कंटाळून दिग्दर्शकाने ‘ओके’ म्हटलं. पण दिग्दर्शकाला हवे तसे ते दृश्य वठले नाही हे लक्षात येऊन मी पुन्हा चित्रीकरण करण्याची विनंती केली आणि मला थोबाडीत मारणाऱ्या व्यक्तीला मला खरोखरच जोरात थोबाडीत मार, अशी विनंती केली. त्यानेही अगदी खरी थप्पड मला मारली. मला जोरात लागलंही. पण तो शॉट दिग्दर्शकाला अगदी हवा तसा मिळाला होता.
मी काही गोष्टी कटाक्षाने पाळतो, त्या म्हणजे काम मिळतंय म्हणून कुठल्याही कामाला मी होकार देत नाही. खूप निवडक कामांनाच मी प्राधान्य देतो. त्यामुळे तुम्हाला स्वत:लाही घडवता येतं. हातात मिळेल ते सर्व करत गेलात तर तुमचं मूल्य कमी होतं. या क्षेत्रात असं म्हटलं जातं की, तुम्हाला ‘जेब’ व ‘जॉब’ असं दोन्हींचं समाधान मिळायला हवं. मी या दोन्ही गोष्टी प्रत्येक वेळी बघतोय असं नाही. कधीतरी यातल्या दोन्ही गोष्टी मिळतात तर कधी चुकतात.
सध्या जाहिरातीमध्ये सामान्य चेहऱ्यांना खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. उत्पादनाच्या गरजेनुसार जाहिरात क्षेत्रात सामान्य चेहऱ्यांचा भाव वधारला आहे. माझी कॅडबरीची जाहिरात पाहून मला एका कन्नड जाहिरातीसाठी विचारणा झाली. कन्नड भाषा येत नसल्यामुळे मी सकाळी दोन तासांत कन्नड शिकून मोबाइलवर शूट करून त्या दिग्दर्शकाला माझा व्हिडीओ पाठवला आणि ती जाहिरात मला मिळाली. मला असं वाटतं की इथे संधी खूप आहे, फक्त तुम्ही कष्ट करण्याची तयारी ठेवायला हवी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 10:42 am

Web Title: man me laddu phoota
टॅग : Entertainment,Marathi
Next Stories
1 जगण्याचं नवं भान देणारं‘गेट वेल soon’
2 शांत, नि:शब्द, करुण प्रेमकथा
3 ‘द ह्य़ूमन फॅक्टर’चा आज खेळ
Just Now!
X