ज्येष्ठ विधीज्ञ, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अ‍ॅड. रघुनाथ यादवराव वाघ (७९) यांचे प्रदीर्घ आजाराने मंगळवारी सकाळी निधन झाले. महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांचे ते वडील होत. ‘अण्णा’ या नावाने ते सर्वपरिचत होते. त्यांच्या पश्चात तीन बहिणी, दोन मुलगे, दोन मुली, जावई, सून, भाऊ, नातू असा परिवार आहे.
दीड वर्षांपूर्वी पडल्याने अण्णांच्या डोक्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. समाजकारण व राजकारणाचे संस्कार घरातून मिळालेल्या अण्णांनी राजकीय, सामाजिक व वकिली क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली. शहरातील सेंट्रल मिडल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या अण्णांनी हंप्राठा महाविद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. विधी शाखेचे शिक्षण त्यांनी पुण्यातून पूर्ण केले. त्यानंतर १९६२ मध्ये अ‍ॅडव्होकेट कायद्यानुसार घेत वकिली व्यवसायाचा श्रीगणेशा केला. फौजदारी खटले चालविण्यात त्यांचा हातखंडा होता.
वकिली व्यवसायात जम बसविताना दुसरीकडे राजकीय क्षेत्रातही त्यांचा संचार राहिला. नाशिक नगरपालिकेत स्वीकृत सदस्य, उपनगराध्यक्ष, काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद अशी अनेक पदे त्यांनी भूषविली. नाशिक बार असोसिएशनचे उपाध्यक्षपद त्यांनी १५ वर्ष सांभाळले. १९७३ मध्ये वसंतराव गुप्ते नगराध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी उपनगराध्यक्षपद सांभाळले. स्कूल बोर्डाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. नाशिक न्यायालयातील वकिलांचे चेंबर इमारत उभारणी, विस्तारीत न्यायालयाची इमारत, न्यायालयातील आयटी वाचनालय या कामात त्यांचे मोठे योगदान होते. सायंकाळी वाघ यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी आ. वसंत गिते, उत्तम ढिकले, आ. बबन घोलप, आ. जयंत जाधव, उपमहापौर सतीश कुलकणी, प्रकाश लोंढे, माकपचे श्रीधर देशपांडे, अ‍ॅड. जयंत जायभावे, अ‍ॅड. बाळासाहेब आडके आदी उपस्थित होते.