पत्नीची हत्या करणाऱ्या नराधमास सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. एकही साक्षीदार नसताना आणि ठोस पुरावे नसतानाही केवळ पोलिसांनी गोळा केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
महावीर हुलंगरे (५०) हा भांडुपच्या खिंडीपाडा येथे पत्नी लता (४२) आणि तीन मुलांसह राहात होता. महावीरला नोकरी नव्हती. त्यातच त्याला मद्याचेही व्यसन होते. लता एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. परंतु महावीरला लताच्या चारित्र्यावर संशय होता. त्यावरून त्यांच्यात नेहमी भांडणे होत असत. ३० एप्रिल २०१२ रोजी दोघांमध्ये असेच भांडण झाले. त्या भांडणात महावीरने लतावर चाकूने ३० ते ३५ वार केले. त्यात तिचा मृत्यू झाला.
भांडुप पोलिसांनी महावीरला अटक केली खरी, परंतु या घटनेचा एकही साक्षीदार नसल्याने पोलिसांपुढे न्यायालयात हा गुन्हा सिद्ध करून दाखविणे हे एक मोठे आव्हान होते. भांडुपचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दत्तात्रय भरगुडे यांनी या प्रकरणात सखोल तपास करून परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यास भर दिला.
आरोपीने गुन्हा करताना वापरलेला चाकू त्यांनी मिळविला. लताच्या कपडय़ांवरील रक्ताचे डाग आरोपीच्या रक्ताशी जुळत असल्याचा अहवाल होता. शेजाऱ्यांनी भांडणाचा आवाज ऐकला होता. त्यांना साक्ष देण्यास त्यांनी तयार केले.
त्या पुराव्याआधारे सत्र न्यायालयाने महावीर हुलंगरे याला पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली दोषी धरले आणि त्याला जन्मठेप आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ६ महिने आणखी कारावासा भोगावा लागणार आहे. प्रत्यक्ष साक्षीदार नसताना केवळ परिस्थिीतीजन्य पुराव्याआधारे एखाद्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाण्याचे हे दुर्मिळ उदाहरण असल्याचे सध्या विशेष शाखा २ येथे कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भरगुडे यांनी सांगितले.