वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्याला व्यसनाधिनतेमुळे होणाऱ्या मृत्यूचे दर्शन झाले. या दृष्याने त्याचे मन हेलावले. व्यसन करण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्याच्या दुष्परिणामाची माहिती नसल्याचे त्याच्या लक्षात आले आणि तेव्हापासून तो ‘व्यसनमुक्त समाज’ करण्यासाठी धडपतोय..
रोहित रामेश्वर गणोरकर असे ध्येयवेडय़ा तरुणाचे नाव आहे. तो नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एम.बी.बी.एस.च्या तृतीय वर्षांला शिकतो. गेल्यावर्षी द्वितीय वर्षांला असताना तो ‘अतिदक्षता विभागात’ गेला. अन् त्याला एकाच दिवशी व्यसनाधिनतेमुळे तीन जणांचे मृत्यू बघायला मिळाले. या घटनेचा परिणाम त्याच्या मनावर झाला. यासाठी आपण काहीतरी करायला हवे, असा विचार त्याच्या मनात घोळू लागला. विशेष म्हणजे, जे लोक व्यसन करतात, त्यांना त्या व्यसनाच्या परिणामाची माहिती नसते, हे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने समाजामध्ये जनजागृती करण्याचे ठरवले. याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये व्यसनमुक्त भारत करण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याचे आवाहन केले.
पंतप्रधानांच्या या घोषणेमुळे डॉ. रोहितला काम करण्यासाठी आणखी प्रेरणा मिळाली. व्यसनामुळेच आत्महत्या होत असल्याचेही त्याच्या लक्षात आले. सर्वप्रथम त्याने अमरावती जिल्ह्य़ातील करजगाव येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ‘व्यसन व त्याचे होणारे दुष्परिणाम’ समजाऊन सांगितले. येथूनच त्याचे जनजागृतीचे कार्य सुरू झाले अन् ते सध्याही सुरूच आहे. अमरावती जिल्ह्य़ातील बहुतांश महाविद्यालयात त्याचे व्याख्यान आयोजित केले जात आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असताना तो वेळात वेळ काढून या समाजकार्यासाठी धावपळ करतो. मित्रमंडळी व समाजातील जागरुक नागरिक यांचे प्रोत्साहन मिळत असल्याने त्याला काम करण्यास आणखी उत्साह येत आहे.
त्याच्या या जनजागृतीचा असा परिमाम झाला की अमरावती व नागपूर जिल्ह्य़ातील दोनशे तरुणांनी जीवनभर व्यसनरहीत राहण्याचा दृढनिश्चय केला. एवढेच नव्हे तर तसे शपथपत्रही त्यांनी भरून दिले. जनजागृती करण्यासाठी त्याने स्वत एक माहितीपत्रक तयार केले. त्यात तंबाखूजन्य पदार्थ व दारूपासून गोणारे मृत्यू आणि आपण काय करू शकतो, याची इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे. हे माहिती पत्रक जनजागृतीसाठी तो जेथे जातो तेथे वाटप करीत असतो. तंबाखूमध्ये अल्कलाईड निकोटीन हा द्रव्य असतो. ते एकप्रकारचे विष असून ते मेंदूवर प्रभाव करते. वडील, काका, भाऊ खातात म्हणून, काम करताना सहज विरंगुळा म्हणून तंबाखूजन्य पदार्थ खाल्ले जातात.
तंबाखूजन्य पदार्थ व सिगारेटमुळे हृदयरोग, मेंदूरोग, फुफ्फुसाचे आजार, अन्न नलिका, तोंड, घसा व स्वादुपिंडाचे कर्करोग होतात व लवकर मृत्यू ओढवतो.
समजा दहा रुपये किमतीचा तंबाखूजन्य खर्रा किंवा पुडी एका दिवशी एक जरी खाल्ली तरी दहा वर्षांत ३६ हजार ५०० रुपये खर्च होतो. हे एका शेतकऱ्याच्या वार्षिक उत्पन्नाऐवढे असते. त्यामुळे शारीरिक आणि आर्थिक नुकसानही होते, हे डॉ. रोहीत नागरिकांना समजाऊन सांगतो. व्यसनाधीन लोकांना व्यसनापासून परावृत्त करणे हे फार कठीण काम आहे. नवीन पिढीला आपण वैद्यकीय व सामाजिकदृष्टय़ा व्यसनाचे दुष्परीणाम पटवून दिल्यास ती पिढी व्यसनरहीत होईल, असा त्याला ठाम विश्वास आहे.