१९७२ सालच्या दुष्काळात पाण्याची पातळी खाली गेली नव्हती. लोकांनी त्या काळात पाण्याचे नियोजन केले होते. पाण्याची पातळी अत्यंत खाली गेल्याने आजचा दुष्काळ १९७२ पेक्षा भयंकर आहे. म्हणून येत्या काळात दुष्काळाची परिस्थिती येऊ द्यायची नसेल, तर  पडणाऱ्या पावसाचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्यातील पाणीप्रश्नाचे अभ्यासक, ‘लोकसत्ता’ चे वरिष्ठ सहसंपादक अभिजित घोरपडे यांनी केले.
तुळजापूर येथे भारत निर्माण लोकमहिती अभियानांतर्गत आयोजित शेती तंत्रज्ञान व दुष्काळी भागात पाण्याचा वापर या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
यावेळी पत्र सूचना कार्यालयाचे संचालक प्रशांत पाठराबे, माध्यम अधिकारी सयद अख्तर, सोलापूर क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे अधिकारी अंकुश चव्हाण, नाबार्डचे अधिकारी सी. डी. देशपांडे उपस्थित होते.
घोरपडे म्हणाले की, हिरवे बाजार हे गाव आपल्या पुढे आदर्श रोल मॉडेल आहे. त्या गावातील लोकांनी पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब मातीमध्ये जिरवला. सतत दोन वर्षे पाऊस पडला नाही तरी त्या गावात दुष्काळ अजिबात जाणवणार नाही. त्याचप्रमाणे वाळूउपशामुळे सुद्धा भूजलपातळी अत्यंत खाली गेली आहे. म्हणून येत्या काळात पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात नाबार्डच्या कृषीविषयक योजनांची माहिती देशपांडे यांनी दिली. यामध्ये केंद्र शासनाच्या शेतीपूरक योजना, बंदिस्त शेळी पालनाविषयी योजनेचे फायदे सांगून या योजनांचा लाभ जनतेने घेऊन विकास साधावे, असे आवाहन केले.