साक्री तालुक्यातील तीन प्रकल्पांवर आता धुळेकरांची तहान भागविण्याची जबाबदारी येऊन पडली असताना पुढील सहा महिन्यातील टंचाईला तोंड देण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन सुरू झाले आहे. धुळे तालुक्यातील अक्कलपाडा धरणातील मृतसाठा हा राखीव ठेवण्यात यावा आणि टंचाईचे स्वरूप अधिक बिकट झाल्यावर जनतेच्या मागणीनुसार हे पाणी पिण्यासाठी सोडण्यात यावे, असे आदेश जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुंबई येथे जलसंपदा मंत्र्यांच्या दालनात धुळ्यासाठी पांझरा नदीतील आरक्षित १०६० दशलक्ष घनफुट जलसाठय़ाचे नियोजन करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आ. शरद पाटील यांनी धुळे शहराबरोबर परिसरातील खेडय़ांमधील टंचाईवर काय नियोजन केले आहे, असा सवाल केला. त्यावर तटकरे यांनी अधिकाऱ्यांना वरील आदेश दिले. अलिकडेच जिल्हाधिकारी आणि पाणी पुरवठा विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांनी अक्कलपाडय़ाापर्यंत पाणी आणण्याचे नियोजन सुरू केले होते. सध्या अक्कलपाडा धरणात ६६९ दशलक्ष घनफुट जलसाठा शिल्लक आहे. अक्कलपाडा धरणातील जलसाठा वाढल्यावर सदर पाणी उजव्या कालव्याव्दारे धुळे शहरात आणण्याचे नियोजन सुरू आहे.